सोलापूर : सोलापूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये बांधण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते आज रविवारी थाटात करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने होत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सून आल्याने सोलापूरकरांनी त्यांचे रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, ढोल – ताशांच्या निनादात गुलाबपुष्प उधळून स्वागत केले.
पाथरूट चौकाजवळील अण्णाभाऊ साठे नगर, मातंग वस्ती येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख होते. तर महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटोळे, नगरसेवक रवि कैय्यावाले, नगरसेवक राजकुमार पाटील, विजय अडसूळे, संजय साठे, यतिराज अडसूळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी श्रीमती साठे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे. समाजातील शिक्षितांचे प्रमाण वाढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजाला प्रगतीची द्वारे खुली व्हावीत यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत.
याप्रसंगी नगरसेवक सुनिल कामाठी यांच्या हस्ते श्रीमती साठे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या दोन मजली सांस्कृतिक भवनामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प साकारण्यात येणार आहे. तसेच प्रशस्त हॉल, कार्यालय, भव्य व्यासपीठ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, सुरेश पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मातंग समाजाचे पंच भोलेनाथ साबळे, संभाजी डुकरे, अनिल साठे, दत्ता अडसूळे, बाळू गायकवाड, लालू साठे, सुधाकर अडसूळे, दत्ता कांबळे, विजय अडसूळे, संजय साठे, राम बोराडे, सतिश गायकवाड, राज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
नगरसेवक सुनीलभाऊ कामाठी यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर लालू साठे यांनी आभार मानले.
* लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना माढ्यात अभिवादन
माढा – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त माढ्यातील मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती मध्यवर्ती मंडळाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे दादासाहेब साठे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुराज कानडे, शंभूराजे चवरे , समर्थ भांगे, माजी नगराध्यक्ष अनिता सातपुते, माजी नगराध्यक्ष गंगाराम पवार, राहुल लंकेश्वर , नगरसेविका सुप्रिया बंडगर, नगरसेवक शहाजी साठे, संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक अजिनाथ माळी तसेच माढा पोलीस स्टेशनचे सपोनि शाम बुवा, उपनिरीक्षक किरण घोंगडे, किरण पवार, कुंदन पवार , डॉ. हनुमंत शिरसागर, प्रवीण पवार, दत्ता पवार , रमेश थोरात , महादेव देवकुळे यांची उपस्थिती होती.