सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शिरापूर – मोरवंची परिसरात आज मंगळवारी पहाटे ४.३० ते ५ च्या दरम्यान अज्ञात प्राण्याने वासराचा फडशा पाडला. परिसरातील ठसे आणि ज्याप्रकारे वासरू मारुन पडले आहे, त्यावरून वासराची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.मात्र यामुळे वनविभाग सतर्क झाले आहे. घटनास्थळी जावून पाहणी केली जात आहे.
तेथील शेतकरी दिग्विजय ताकमोगे यांच्या शेतात हा प्रकार घडला आहे. दिग्विजय ताकमोगे हे आज पहाटे ४.३० वाजता शेतात दूध घेण्यासाठी गेले होते. घटनास्थळी ३ वासरे जागेवर होती. ताकमोगे हे रोजच्या प्रमाणे पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्याकरिता गेले. तासाभरानंतर ते पाणी देऊन आल्यावर त्यातील एक वासरू जागेवर नव्हते. त्यांनी परिसरात पाहिल्यावर तिथे वासरू नव्हते.
मात्र इतर दोन वासरं ज्या दिशेला वारंवार पाहत होती, त्या दिशेला शोध घेतला असता सुमारे १०० फुटांवर फाडलेले वासरू दिसून आले. त्या वासराला दात लागल्याच्या खुणा शरीरावर दिसत आहेत. ‘त्या’ प्राण्यांने वासराला १०० फुटांपर्यंत फरफटत नेल्याच्या खुणा आणि पायाचे ठसे ही तिथे उमटल्याचे दिसले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी सतर्क झाले असून घटनास्थळी भेट देण्यासाठी ते रवाना झाले आहेत.आम्ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत. तो प्राणी बिबट्याच आहे की अन्य काही याचा निष्कर्ष पुढील काही तासांतच काढण्यात येईल, असे जयश्री पवार ( वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, सोलापूर) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सोलापूर शहरामध्ये २७ जुलै रोजी मौजे कोंडी परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळला होता. वन विभागाचे अधिकारी हे घटनास्थळी जावून या परिसराची पाहणी केली होती. त्या ठिकाणी बिबट्याचे पाऊलखुणा आढळल्या होत्या त्यावरून वन विभागाने पाहणी करून ट्रॅप लावला होता, तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
काल सोमवारी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी कोंडी येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. एमआयडीसी भागामध्ये नागरिक कामासाठी ये-जा करत असतात, या घटनेने त्या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत. त्या भागामध्ये अजून ट्रॅप लावण्याची गरज आहे अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन बिबट्या पकडण्याचा प्रयत्न करावा आणि तज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्या जेरबंद करण्याच्या सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी वन अधिका-यांना दिल्या होत्या. त्यांच्या दुस-या म्हणजे आजच हा प्रकार घडल्याने आणखी भीती वाढली आहे.
” तेथील कामगारांनी आणि त्याभागात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर रात्रीच्या वेळेला बाहेर जाताना हातामध्ये टॉर्च घ्यावी आणि एकट्याने कुठेही फिरू नये. कोणीही घराबाहेर शौचालयास जाऊ नये, घराबाहेर रात्रीचे झोपू नये. लहान मुले घराबाहेर खेळत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवा. बिबट्या सदृश्य पाणी दिसल्यास वनविभागाला कळवावे”
जयश्री पवार – वनपरिक्षेत्र अधिकारी