मुंबई : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपली वेगळी वाट धरली. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तर, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
नरेंद्र पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीही पुढाकार घेऊन सभा आणि बैठकांना उपस्थिती लावत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले. त्यानंतर, त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदलाय.
”जे पोटात तेच ओठात असणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील एकमेव नेते आहेत. त्यांची कार्यपद्धती अन् कर्तुत्वाचे आपण फॅन झालोय,” असे नरेंद्र पाटील यांनी हा टॅटू गोंदल्यानंतर म्हटलं. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम पुन्हा जगजाहीर झालंय. त्यांनी आपण हे नाव ह्रदयावरच गोंदवणार होतो असेही आवर्जून सांगितले. देवेंद्र फडणवीसांना हे कळाल्यावर रागावल्याचेही सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदलाय. गोंदवून आठवडा झाला असला तरी आता ते प्रकर्षाने समोर आल्याने चर्चा होत आहे.
माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमिती आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असा दावाही नरेंद्र पाटील यांनी पक्ष सोडताना केला होता.
नरेंद्र पाटील हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपामध्ये आले होते. मात्र २०१९ मध्ये साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून हे पद काढून घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.