शिराळा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी दिवशी शहर पूर्णपणे बंद राहणार आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटीप्रमाणे नागपंचमी साजरी करत असताना नागप्रतीमेची मिरवणूक देखील काढता येणार नाही, असे प्रांतधिकारी ओमकार देशमुख यांनी सांगितले.
येथील तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर, मुख्याधिकारी योगेश पाटील उपस्थित होते. नागपंचमी साजरी करण्याबाबत शासनाच्या नियमावली बद्दल बोलताना ते म्हणाले, घरोघरी नगप्रतीमेचे पूजन करण्यास परवानगी आहे. अंबामाता मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे. नागपंचमी दिवशी तालुक्यात एस टी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरील लोकांना शिराळा शहरात येण्यास पूर्णतः मनाई असणार आहे. त्याकरिता ठिक ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नगरपंचायतीने आरोग्याच्या दृष्टीने शहरात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी केली आहे. नाले सफाई व स्वच्छ्ता केली आहे. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था केली आहे. महत्त्वाच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. इतरी सोई सुविधा पुरविल्या आहेत. नागपंचमीसाठी निघणाऱ्या पालखीच्या मिरवणुकीला १० लोकांची तर मंदिरात ५ लोकांना पूजेसाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
* अशा नोटिसा आणि पोलिस बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आणि नागपंचमी शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील १० नागरिकांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत तर दुसऱ्या १० नागरिकांना त्या दिवशी शहरबंदी करण्यात आली आहे. ६५ नाग मंडळांना वन कायद्याचे उल्लंघन होणार नाही यासाठी नोटिसा दिल्या आहेत. शहरात नागपंचमी दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षक १, पोलीस निरीक्षक ११, पोलीस कर्मचारी १७५, वाहतूक पोलीस २०, महिला पोलीस १९, व्हिडिओ ग्राफर ५, दंगल नियंत्रण पथके २, ध्वनी मापक यंत्रे २, याचबरोबर वन विभागाने सहाय्यक वन संरक्षक ४, वन क्षेत्रपाल १८, वनपाल ३०, वनरक्षक ५०, ड्रोन कॅमेरे २, व्हिडिओ कॅमेरे ६, फिरती पथके ६, गस्ती पथके १०, श्वान पथक १ असा मोठा बंदोबस्त तैनात करून प्रबोधन फेरी काढून संचलन केले.