मंगळवेढा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आठवडा बाजार मंगळवेढा येथे त्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवात जवळपास 24 प्रकारच्या रानभाज्या तालुक्यातील विविध भागातून शेतकर्यांनी विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या.
त्यामध्ये प्रामुख्याने कडवंची, चिघळ, घोळ, पाथरी, राजगिरा, अंबाडी, सराटा, तांदूळजा, उंबर, केना, आघाडा, आळूची पाने, शेवग्याची पाने, बांबू, गुळवेल टाकळी, कुरडू, ओवा पाने आदी दुर्मिळ होत चाललेल्या रान भाज्यांचा समावेश होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कार्यक्रम प्रसंगी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. मोठ्या प्रमाणावर भाज्यांची विक्री झाली.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ, नगरपालिका प्रशासन अधिकारी विनायक साळुंके, सुधाकर मासाळ, अॅड. रमेश जोशी, दिगंबर यादव, सुखदेव जाधव, दर्याप्पा दत्तू, सुहास पंडित, सत्यजित सुरवसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी मारुती कोलगे, शिवकुमार पुजारी, राजेंद्र भांगे, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन कृषी सहायक प्रशांत काटे यांनी केले तर आभार आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम सावंजी यांनी मानले. कार्यक्रमाचा उद्देश व प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले.