पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण होत गेला. राष्ट्रवादीकडून द्वेष निर्माण करण्यासाठी राजकारण करण्यात आले. मी प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण देखील वाचलेत, असेही राज ठाकरे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. जातीयवादाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज यांनी आज पुण्यात प्रतिक्रिया दिली. सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नका,’ असा टोला राज यांनी पवारांना हाणला आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा. निवडणुकीच्या फायद्यायाठी आरक्षणावरून तरुणांची माथी भडकवू नका,’ असंही त्यांनी सुनावलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला, असं वक्तव्य राज यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. जेम्स लेन हा कुठून आला? असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसनं विनाकारण त्याचा बाऊ केल्याचं राज म्हणाले होते. जेम्स लेनचा उल्लेख आल्यानं संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघानं राज यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर, शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता.
‘मी प्रबोधनकार आणि यशवंतराव चव्हाण दोघांचीही पुस्तकं वाचली आहेत. पण मी बोलतो त्याचा आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे पवार साहेबांनी मला समजावून सांगावं. त्यांनी सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नये,’ असं राज यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच जातीयवाद वाढल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ‘देशात हजारो वर्षांपासून जाती आहेत; पण जात हा मुद्दा निवडणूक वेळी समोर येतो. १९९९ पर्यंत केवळ जाती आणि अभिमान होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जाती द्वेष वाढला. आधी प्रत्येकाला जातीबद्दल अभिमान वाटायचा, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर द्वेष सुरू झाला. हे सर्वांना माहितीय. मी केवळ बोललो,’ असं ते म्हणाले.