सोलापूर : सोलापूर – अक्कलकोट महामार्गावर वळसंग (ता. दक्षिण सोलापूर ) येथील ग्रामसचिवालयासमोर पायी चालत जाणार्या भाविकांना अज्ञात वाहनाने ठोकरले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
तोगराळी ( दक्षिण सोलापूर ) येथील रहिवासी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पायी चालत जात असताना पहाटे 5 च्या सुमारास अज्ञात वाहनाने ठोकरल्याने हा भीषण अपघात झाला. रत्नाबाई तुकाराम कोळी (वय 48 रा. तोगराळी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्पना श्रींमत पाटील (वय 50) , मिनाबाई शेटेप्पा कोळी (वय 52 दोघेही रा.तोगराळी, तालुका दक्षिण सोलापूर ) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार केले असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करीत असल्याचे ठाणे अंमलदार चव्हाण यांनी सांगितले..
* पूर्व वैमनस्यातून अक्कलकोटमध्ये खून
अक्कलकोट तालुक्यातील भोसले गावरोड येथील नूरुद्दिन बाबा दर्गाच्या पाठीमागील मैदानामध्ये शनिवारी (ता. 21) सकाळच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली, याची माहिती अक्कलकोट उत्तर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यासह इतर पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मृतदेह पाहिल्यावर मयताच्या चेहऱ्यावर गंभीर इजा दिसून आल्या. एकंदरीत मृतास दगडाने ठेचून मारले असल्याचा अंदाज व्यक्त केला. मृतदेहाची ओळख पटली नाही, मात्र त्याचवेळी एक इसम तिथे आला आणि तो मयताचा भाऊ निघाला. त्यानंतर मृताची ओळख पटली. खून झालेल्या इसमाचे नाव महेश मडीखांबे (वय – 40, भीमनगर, अक्कलकोट) असे नाव निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या शोधासाठी अक्कलकोट उत्तर पोलिसाची हालचाल सुरु झाली आहे.
मयत महेश हा नेहमीप्रमाणे आपल्या घराबाहेर सायंकाळच्या सुमारास उभा होता, त्याचे इतर दोन मित्र हे त्या ठिकाणी आले आणि त्याला चल पार्टी करूया असे म्हणून भीमनगर येथील घराजवळून घेऊन गेले ते महेश परत आलाच नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाल्याचं समजलं. दारू पिण्यास गेल्यानंतर महेश मडीखांबे याची त्या दोन मित्रांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर शिवीगाळपर्यंत पोहोचले आणि शिवीगाळचे रूपांतर हाणामारीत झाले आणि हाणामारीचे रूपांतर थेट खुनामध्ये झाले, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या खून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे पुढील तपास करत आहेत.