मुंबई / रायगड : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. मात्र त्यांना जामीन देताना महाड कोर्टाने काही अटीही घातल्या आहेत. त्यानुसार भविष्यात असे वक्तव्य केले जाणार नाही, ऑडिओ चेक करण्यासाठी एकदा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार, 30 ऑगस्ट व 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजर राहावे लागणार, कागदपत्रे व पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही.
रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नारायण राणेंना रात्री रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. नारायण राणेंवर लावण्यात आलेली कलमे चुकीची आहेत. या प्रकरणाला 153 आणि 505 ही कलमे लागू होऊ शकत नाहीत. त्यांच्यावर राजकीय प्रेरित कलमे लावली. तसेच राणेंना अटक करण्यापूर्वी कोणतीही लेखी नोटीस दिली नाही. राणे यांना विविध आजार असून त्यावर नियमित उपचार सुर आहेत. त्यामुळे राणेंना जामीन देण्यात यावा, अशी मागणी राणेंच्या वकिलांनी केली.
तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबाबत बोलल्याने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. त्यांनी केलेल्या वक्तव्यामागे कोणते राजकीय षडयंत्र होते का, हे शोधणे गरजेचे आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते जबाबदार व्यक्ती आहेत, मग त्यांच्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य झालेच कसे? असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून राणे यांना 15 हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.