सोलापूर : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची गुरुवारी (ता. 26 ) रात्री उशिरा निवड करण्यात आली. यासंदर्भात दिनांक 12 ऑगस्ट रोजी सर्वप्रथम दैनिक सुराज्य ने वृत्त प्रसिद्ध केले होते हे तंतोतंत खरे ठरले.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नाना पटोले यांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्याची कार्यकारणी बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात सोलापूरमधील कार्यकारणी बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुरेश हसापुरे, तुंगतचे प्रकाश पाटील यांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे. मध्यंतरी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी धवलसिंह मोहिते-पाटील यांचे नाव फायनल झाले होते. हे वृत्त दैनिक सुराज्यने 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवा नेता म्हणून धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून धवलसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात युवकांचे चांगले संघटन केले आहे. त्याचा फायदा धवलसिंह यांना आता होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील सात महिन्यापूर्वीच धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. धवलसिंह मोहिते-पाटील यांना अध्यक्ष करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच त्यांचे बंधू आमदार धीरज देशमुख हे आग्रही होते. शेवटी त्यांच्या मागणीनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदावर धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड केली.
धवलसिंह यांच्या निवडीला सोलापूर जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता, मात्र शेवटी त्यांचीच निवड झाली. आता धवलसिंह मोहिते-पाटील हे कशा पद्धतीने काम करतात, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचा रोल कशा पद्धतीचा असेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल.