मुंबई : नवी मुंबईच्या बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याची खंत भर कार्यक्रमात बोलून दाखवली. हे वक्तव्य करत असताना मंदा म्हात्रे यांनी आपण कोणालाही घाबरत नसल्याचं म्हणत पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत, असे प्रकार केले जातात. स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यापुढेच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जात असल्याचा आरोप यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असं देखील यावेळी मंदा म्हात्रे म्हणाल्या. त्याचप्रमाणे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंदा म्हात्रे यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या कि, “मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला.” त्याचसोबत, राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, अशी खंतसुद्धा मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मात्र, “आपण कधीही स्वतःला कमी समजू नये”, असा सल्ला यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.
दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतर, कर्तृत्त्व सिद्ध करून दाखवून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी यशोमती ठाकूर यांच्यासमोर आपल्या पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मंदा म्हात्रे यावेळी म्हणाल्या, “महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात.”