सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दोन्ही बाजूंची दुकाने उद्या बुधवारपासून सुरु ठेवण्यासाठी आज परवानगी देण्यात आली आहे.
दुकाने दररोज सुरु ठेवण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री भरणे यांनी आज महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कडून माहिती घेतली, चर्चा केली. त्यानंतर दुकाने सुरु करण्याबाबत सूचना दिल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज सायंकाळी सुधारित आदेश जारी केले. या आदेशात नमूद केले आहे की, उद्यापासून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठेतील दोन्ही बाजूंची दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र रविवारी बंद राहतील.
दुध विक्री करणारी दुकाने, डेअरी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा देणारे उपक्रम यापूर्वीच्या आदेशानुसार सुरु राहतील. याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि महापालिका प्रशासनाचे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि इतर व्यावसायिक संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन दुकाने उघडली जातील. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन केले जाईल, असे चेंबर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी सांगितले.