मोहोळ : मोहोळ रेल्वे स्टेशनजवळील स्लीफर फॅक्टरीतील दीड दिवसाच्या गणेशोत्सवातील ‘श्री’गणेश मुर्तीचे आष्टे बंधाऱ्यावरील सिना नदीच्या पात्रामध्ये शनिवारी (ता.11) विसर्जन करताना पाण्यामध्ये बुडालेला सौरभ सुभाष बेंबळगे (रा. लातूर) या युवकाचा मृतदेह कोळेगांव येथील स्थानिक मच्छीमाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने शोधुन काढण्यास चाळीस तासानंतर अखेर पोलीसांनी आज सोमवारी (ता.13) यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ स्टेशनजवळ रेल्वे रूळाखालील सिमेंटचे स्लीफर तयार करणाऱ्या कारखान्यातील गणेशाच्या मुर्तिचे विर्सजन करण्यासाठी शनिवारी कंपनीचे काही कामगार एका चारचाकी वाहनामध्ये सिना नदीवरील आष्टे बंधाऱ्यावर गेले होते. उपस्थित कामगारापैकी सौरभ सुभाष बेंबलघे हा युवक मोठ्या उत्साहाने श्री मुर्ती घेऊन नदीच्या खोल पात्रात उतरला. परिणामी पाण्याच्या वेगाचा व खोलीचा अंदाज न आल्याने क्षणातच सौरभ बेंबलघे हा पाहता पाहता नदीच्या पात्रात बुडाल्याने बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर स्लीपर कंपनीतीलच प्रकाश पाटील यांनी पोलीसांना दिली होती.
सदर पाण्यात बुडालेल्या युवकाला शोधण्यासाठी कोळेगांव येथील स्थानिक मच्छिमार अनुक्रमे ज्ञानेश्वर भुई, हरिचंद्र भुई, दत्ता भुई, लक्ष्मण भुई, सिंकदर पठाण, दिपक भुई,लक्ष्मण मल्लाव यांनी सलग शनिवार, रविवार व सोमवारी सकाळी या कालावधीत आष्टे बंधारा, कोळेगांव, शिरापुर बंधारा ते लांबोटीचा पुल आदी नदीपात्राच्या परिसरात बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आष्टे येथील सदर दुर्घटना घडलेल्या ठिकाणापासून नदीपात्रात सुमारे दीड ते दोन किलोमिटर अंतरावर कोळेगांव हद्दीत काटेरी बाभळीत अडकलेला मृतदेह मच्छीमार बांधवाना दिसून आला.त्यांनी सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढुन पोलीसांच्या ताब्यात दिला.यावेळी सहाय्यक फौजदार शेख ग्रामरक्षक दलाचे दत्तात्रय मोटे,नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते.
नदीपात्रात शोधकार्य करण्यासाठी कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसताना स्थानिक मच्छिमार बांधवानी मानवतेच्या दृष्टीने प्रशासनाला मदत करीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सदर पाण्यात बुडालेल्या बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह पाण्यातुन शोधुन काढण्यास मदत केली आहे. तरी प्रशासनाने याची योग्य दखल घेत सदर मच्छीमार बांधवांना सन्मानित करावे, अशी अपेक्षा आसपासच्या गावातील नागरिकांनी व्यक्त केली.
* बैलगाडीतून होणारी वाळू चोरी पकडली
बार्शी : तालुक्यात सासुरे येथे बैलगाडीतून होणारी वाळू चोरी पोलिसांनी पकडली. मात्र यावेळी बैलगाडी चालक पळून गेला. याप्रकरणी पोलिस अंमलदार रामेश्वर राजेद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जोतीबा गोपीनाथ करंडे (रा. सासुरे ता. बार्शी) याच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वैरागचे पो.नि. विनय बहिर यांना सासुरे येथील नदीपात्रातून बैलगाडीव्दारे वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ते सपोफौ. हाळे, रामेश्वर शिंदे आणि स्थानिक पोलिस पाटील यांच्यासमवेत दुपारी अडीच वाजता नदीपात्राकडे जात असताना गावातील महंकाळेश्वर मंदिराचे समोर त्यांना बैलगाडीतून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच बैलगाडी चालक जोतीबा करंडे हा बैलगाडी जागेवरच सोडून पळून गेला. त्यामुळे त्यांनी बैलगाडी व वाळू असा सुमारे 1 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. करंडे याच्याविरोधात भा.दं.वि. कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 15 व 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.