सोलापूर : उच्च उत्पादन क्षमतेच्या ज्वारीच्या ‘फुले- रेवती’ या जातीच्या बियाणांचे वाटप कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांना करण्यात आले. या बियाणातून शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. कदम यांच्या हस्ते नियोजन भवन येथे भरडधान्य योजनेअंतर्गत ज्वारी बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मनपा गटनेते चेतन नरोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ कदम यांच्या हस्ते कृषी यांत्रिणीकरण योजनेतून प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी शिवानंद चनबसप्पा बिरादार या शेतकऱ्याला ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.
* बियाणे वाटप लाभार्थी शेतकरी
विठ्ठल गरड, रामचंद्र गरड, ओंकार वाघमोडे, रखमाजी गायकवाड, मारुती गायकवाड, नारायण पोतदार ( सर्व रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) आणि श्रीमती रेखा हजारे, कुसुम साठे, चंदना आवताडे, वालिका डफळे, जयश्री चटके या सर्व महिला शेतकरी (रा. पाकणी, ता. उत्तर सोलापूर)
* घेतला कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय विभागाचा आढावा
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज नियोजन भवन येथे विभागांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा पुरवठा अधिकारी कारंडे आदी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन डॉ. कदम म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे शासनाचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून द्या. कृषी योजनांचा प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. खतांची कमतरता भासणार नाही, याकडे लक्ष द्यावे. खत आणि बियाणे विक्री केंद्रावर तपासणी करून गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ९९ टक्के शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. खरीप पीक कर्ज वाटप ९८ टक्के केल्याने सहकार विभागाचे डॉ कदम यांनी कौतुक केले. यावेळी सहकारी संस्था, लेखा परीक्षण याचाही आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात २९ शिवभोजन थाळी केंद्रातून सुमारे १० लाख ३२ हजार ९९४ गरजू नागरिकांनी थाळीचा लाभ घेतला आहे. या केंद्रांची तपासणी करा, नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जात पडताळणीचे दाखले त्वरित द्या सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहाचा त्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांना वसतिगृहात चांगले जेवण आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जात पडताळणी समितीतर्फे देण्यात येणारे दाखले गरजूंना त्वरित उपलब्ध करून द्या. प्रलंबित जातपडताळणीची प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही डॉ कदम यांनी दिल्या.