मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. बेकायदेशीर वाळू उत्खनन व चोरीला आळा घालण्यासाठी “अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून, वाळू तस्करीचा बिमोड करण्यासाठी महसूल, पोलीस व आरटीओ विभाग एकत्रित प्रयत्न करण्याचे आदेश कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिले.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिलेल्या भेटी दरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिरसी-गोणेवाडी दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाने कारवाईच्या भीतीपोटी पोलीस शिपाई असणारे गणेश सोलनकर यांना धडक देऊन ठार मारल्याच्या घटनास्थळाला विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी भेट दिली. मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या आवारात या गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या अपघातग्रस्त वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. पोलीस ठाण्यात या गुन्ह्यातील आरोपींकडे कसून चौकशी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन मोहिमेने गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन होत असून ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांचे कौतुक केले. पोलीस प्रशासन समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील असते. वाळू व्यवसायात तरुण पिढीचा शिरकाव चिंताजनक असून ऑपरेशन परिवर्तन या धर्तीवर वाळू व्यवसायात येणाऱ्या तरुण पिढीला कसे परावृत्त करता येईल याबाबत मोहीम राबविण्याची विनंती पोलीस अधीक्षक सातपुते यांना केली. चोऱ्या, दरोडे सारख्या घटनेतील रखडलेले तपास गतीने करून आरोपी जेरबंद करण्याच्या सूचनाही लोहिया यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
बेकायदेशीर वाळू उपशासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून छापे टाकले जातील. वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. वाळू उपशास पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करून महसूल व पोलिसांचे एकत्रित पथके तयार करून संयुक्त कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी उपस्थित होते.
* कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत घ्या…
मयत पोलीस गणेश सोलनकर यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपा तत्वावर तात्काळ नोकरीत सहभागी करून घ्यावे त्याचबरोबर या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी विमा योजनेसह शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी एसपी तेजस्वी सातपुते व डीवायएसपी राजश्री पाटील यांना दिल्या आहेत.