चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजप प्रवेश करणार नाही, पण काँग्रेसमध्ये सुद्धा राहणार नाही, असे स्पष्ट केले. माझ्यासोबत खूप वाईट झाले, तसे घडायला नको होते, असेही ते म्हणाले. अमरिंदर यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही भेटले होते. त्यामुळे ते भाजपात जाणार, अशी चर्चा सुरू होती. ते स्वत:चा पक्ष काढतील, असेही बोलले जात आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या.
यासंदर्भातील आपल्या ट्विटमध्ये कॅप्टन म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा झाली. पीक विविधीकरणात पंजाबला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त कृषि कायदे रद्द करावे आणि एमएसपी हमीसह संकट त्वरित सोडवण्याची विनंती केली, असे कॅप्टन यांनी नमूद केलेय.
मात्र, आपण भाजपात सामील होणार नसल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, “आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पाहून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात असून ते असहनीय आहे,” असंही त्यांनी म्हटलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमरिंदर सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. डोवाल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी अमरिंदर सिंग यांनी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार अमरिंदर सिंग यांनी काही महत्वाची कागदपत्र अजित डोवाल यांच्याकडे सुपूर्द केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र ही कागदपत्रं नक्की कशासंदर्भात आहेत याबद्दल खुलासा होऊ शकला नाही.
आपल्या क्षमतांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतर काँग्रेसने अनुसुचित जातीचे उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून निवडलं. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे अमरिंदर सिंग भाजपात जातील, अशी चर्चा होती. मात्र, आपण भाजपात जाणार नसल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे अमरिंदर सिंग यांचं पुढचं पाऊल नक्की काय असेल, याकडे काँग्रेसह राजकीय पंडिताचे लक्ष लागून राहिले आहे.
अमित शहा आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात जवळपास पावणतास चर्चा झाली. यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते. पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषी मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी कायद्यांचा होणारा विरोध शमवण्याची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपचा चेहरा असतील, असेही सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ते स्वत:चा पक्ष काढतील, असेही बोलले जात आहे.