पंढरपूर : भगवद्गीते मध्ये ज्याला अनन्यसाधारण महत्व आहे असा कर्मयोग वै. सुधाकरपंत परिचारक तर ज्ञानयोग वै. वा. ना. उत्पात हे आयुष्यभर जगले. या दोन्ही विभुतींचे निधन झाले तेव्हांच पंढरीतील ज्ञान व कर्म योग संपला, असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलुरकर यांनी केले.
वै.वा.ना. उत्पात यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त त्यांनी निधनापूर्वी पूर्ण केलेल्या श्री हनुमान-जितेंन्द्रियं बुध्दिमताम वरिष्ठम या पुस्तकाचे तसेच त्यांच्यावरील पुण्यतिथी विशेषांकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यास प्रसाद महाराज अंमळनेरकर, शंकर महाराज बडवे, मदन महाराज हरिदास, जयवंत महाराज बोधले, भानुदास महाराज चार्तुमासे, भागवत कथाकार अनुराधा शेटे व आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम ऑनलाईन पार पडला.
यावेळी बोलताना देगलुरकर यांनी वै.वा.ना.उत्पात यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. परंतु त्यांनी आपले लिखाण, वाचन कधीही बंद केले नाही. मृत्यू पूर्वी काही दिवस आधी त्यांनी श्री हनुमानावरील पुस्तक लिहून पूर्ण केले. तर अखेरच्या दिवसात देखील ते रूग्णालयातील पलंगावर बसून भगवद्गीता व रामायण वाचत असत असा अनुभव सांगितला.
प्रभू रामचंद्राच्या भात्यात जसे अनेक सिध्द बाण होते. त्या प्रमाणे वै. उत्पात यांच्या भात्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, हिंदू धर्म, स्वा.सावरकर भक्त, मातृ भक्त, आदर्श शिक्षक, पत्रकारीता असे विविध बाण होते. या सर्वांचा त्यांनी केवळ समाजाच्या हितासाठी वापर केला असल्याचे गौरवोद्गार काढले. वै.सुधाकरपंत परिचारक हे राजकारणात राहून देखील आयुष्यभर दुसर्यासाठी चांगली कर्म करीत राहिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाला अपेक्षित असलेला कर्मयोग स्व. परिचारक तर ज्ञानयोग वै. उत्पात हे खर्या अर्थाने आयुष्यभर जगले असून त्यांच्या निधनामुळे पंढरी रिकामी झाल्याची भावना चैतन्य महाराज देगलुरकर यांनी व्यक्त केली.
जयवंत महाराज बोधले यांनी, ज्यांच्याकडून विविध विषयाचे ज्ञान प्राप्त करावे, अशा व्यक्ती आता थोड्याच राहिल्या असून यामध्ये वै.उत्पात यांचा प्रथम क्रमांक लागतो असे प्रतिपादन केले. त्यांच्यामुळेचे आमच्या बोधले घराण्यातील परंपरा जीवंत असल्याची आठवण देखील सांगितली.
यावेळी विविध मान्यवरांनी वै. उत्पात यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश उत्पात यांनी तर आभार ज्योती कुलकर्णी यांनी मानले.