लातूर : इतर बिलासह भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करीत पंचायत समितीच्या एका कर्मचा-याने गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या कक्षात विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
तेथील कर्मचा-यांनी तात्काळ त्यांना जवळच्या शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल केले. हा कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त होणार होता. त्याच दिवशी त्यांनी विषारी द्रव प्राशन केले आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.
मिलिंद ज्ञानदेव हौसलमल (वय ५८) असे विषारी द्रव प्राशन केलेल्या कर्मचा-याचे नाव आहे. हौसलमल हे जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक होते. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी त्यांची लातूर पंचायत समितीत बदली झाली होती. ही बदली नियमाप्रमाणे नाही, असा आरोप करीत त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. दरम्यान, ते बुधवारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले होते.
हौसलमल यांनी सन २०१९ मध्ये चार वैद्यकीय बिले जिल्हा परिषदेकडे सादर केली होती. त्यापैकी दोन बिले मिळाली होती तर उर्वरित दोन बिले मिळाली नव्हती. त्यासंदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित विभागाच्या कर्मचा-यास नोटीस बजावली होती. याशिवाय, महाराष्ट्र दर्शनचे बिल मिळाले नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नाही, असा आरोप त्यांचा होता.
काल गुरुवारी सकाळी हौसलमल हे जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या दालनात येऊन काहीतरी लिहित होते. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे व कर्मचारी कामात व्यस्त होते. तेव्हा हौसलमल यांनी लिहित असलेले कागद फेकून देत मी आता राहत नाही, असे म्हणत विषारी द्रव प्राशन करीत बाटली फेकून दिली. त्यामुळे कक्षात गोंधळ उडाला आणि डॉ. वडगावे यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* नीट परिक्षेत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेतील विसंगतीमुळे विद्यार्थ्याचे नुकसान
बार्शी : गेल्या 12 सप्टेंबरला पार पडलेल्या देशव्यापी नीट परिक्षेत जिल्ह्यातील एका केंद्रावर परिक्षार्थ्यांना विसंगत कोडच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिल्या गेल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने परिक्षा आयोजक नीट आणि केंद्रिय आरोग्य मंत्रालयाला नोटीसा बजावल्या आहेत. तसेच पुढील तारखेला या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील अभिषेक कापसे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील वैष्णवी भोपले यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 7 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. पुजा थोरात, ऍड. गजानन कुकडे, ऍड. एच.एस. शिंदे यांनी काम पाहिले.
अभिषेक आणि वैष्णवी यांचा कुंभारी येथील स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नंबर आला होता. यावेळी पर्यवेक्षकाने त्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेचे सीलबंद पाकिट न देता फोडून दिले. त्यामुळे प्रश्नपत्रिका वेगळ्या क्रमाकांची आणि उत्तरपत्रिका वेगळ्या क्रमांकाची दिली गेली. त्यांनी लागलीच ही बाब पर्यवेक्षिकेच्या निदर्शनास आणून दिली. मात्र तिने आपलेच बरोबर आहे म्हणून त्यांना गप्प बसविले. त्यांनी वारंवार विनंती केली मात्र पर्यवेक्षिकेने दाद दिली नाही.
त्यामुळे आपले शैक्षणिक नुकसान होणार आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिक्षा झाल्यानंतर लागलीच जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. जिल्हाधिकार्यांनी सुनावणी घेवून वरिष्ठांना अहवाल पाठविला. याबाबत नीट कडून अद्यापपर्यंत कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्यायमुर्ती आर.डी. धनुका आणि एम.एस. कर्णिक यांच्या व्दिसदस्यीय पीठासमोर झाली. याचिकेचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयाने वरील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले.