नवी दिल्ली : व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास डाऊन झालेल्या या सोशल मीडियातील सेवा तब्बल ६ तास बंद राहिल्या आहेत. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. आता, पुन्हा या सेवा सुरू झाल्या आहेत. याबाबत स्वत: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने माहिती दिली. तसेच, आपल्या युजर्संची माफीही मागितली आहे.
मात्र या सहा तासात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने तसेच एका जागल्याने (व्हिसलब्लोअरने) कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसलाय. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचं (४४ हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला. मार्क सध्या मायकोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा एका स्थानाने खाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी या कंपनीच्या शेअर्सची मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले. सप्टेंबरच्या मध्यापासूनच कंपनीच्या शेअर्सला घरघर लागली असतानाच या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत घसरलेत. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती १२ हजार १६० कोटी डॉलर्सवर आलीय. ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये मार्क एका स्थानाने खाली घसरला असून तो आला बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेलाय. सोमवारी फेसबुकच्या सेवेमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला.
सोमवारी रात्री अचानक फेसबुक आणि व्हॉट्सएप डाऊन झाल्याने अनेकांनी आपले इंटरनेट कनेक्शन चेक करायला सुरुवात केली. काहींना वाटले हा केवळ आपल्या एकट्यापुरताच विषय आहे. मात्र, थोड्यात वेळात एकमेकांमध्ये याची चर्चा सुरू झाली, तर ट्विटरही हीच चर्चा रंगली. त्यानंतर, काही वेळांतच माध्यमांमध्ये ही बातमी आल्याने हे सर्व्हर डाऊन झाल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. त्यामुळे, नेटकरी हैराण झाले होते. मात्र यात सोशलमीडियामुळे अनेकजण रात्र रात्र जागून काढणा-या नेटक-यांना काल चांगली झोप लागली. अनेकांचा संपर्क तुटल्याने हवालदिल झाले होते.
तुमची काळजी करणाऱ्या तुमच्या लोकांसोबत तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे किती जोडले आहात, हे मला माहिती आहे. या सेवांमुळे ती बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच, आमच्याकडून झालेल्या व्यत्ययाबद्दल मी आपणा सर्वाची माफी मागतो, अशी फेसबुक पोस्ट फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने केली आहे.
भारतीय वेळेनुसार पहाटे ४.३० ते ५ च्या सुमारास मार्कनेही ही पोस्ट केली आहे. दरम्यान, या सेवा बंद झाल्यामुळे ट्विटरवर फेसबुकचा ट्रेंड सुरू होता. अनेकांनी आपल्या मनातील भावना आणि ही माहिती देण्यासाठी ट्विटर व टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म वापरला.
* कधी चालू झाले ? तांत्रिक मुद्दा
आज मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. काही जणांच्या मते या सर्वरचं डीएनएस खराब झाल्याने सेवा बंद झाल्याचं बोललं जात आहे. DNS हा इंटरनेटचा कणा मानला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर अथवा कॉम्प्युटरवर वेबसाईट ओपन करता तेव्हा DNS तुमच्या ब्राऊजरला कुठल्याही वेबसाईटचा आयपी काय आहे हे सांगतो. प्रत्येक वेबसाईटचा एक आयपी असतो. ट्विटर, फेसबुक प्रकरणात DNS तुमच्या ब्राऊजरला ट्विटर, फेसबुकचा आयपी काय आहे ते सांगतो. अशावेळी फेसबुक, ट्विटरचा रेकॉर्ड असलेला DNS डेटाबेसमधून काढून टाकला जातो. तेव्हा तुम्ही फेसबुक, ट्विटर एक्सेस करू शकत नाही.