पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील एक वर्षापासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. याचबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी अशा प्रमुख यात्रा देखील शासनाने रद्द केल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटस्थापनेच्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील कोरोनाच्या नियमांचे पालन करून दररोज 10000 भक्तांना केवळ मुखदर्शन देण्याचा निर्णय आज मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर होते. यावेळी प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, समितीचे सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेश कुमार कदम, भास्कर गिरी गुरु किसंनगिरी बाबा, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ, शिवाजीराव मोरे, साधना भोसले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी सुरेश कदम आदी उपस्थित होते.
या बैठकीत शासनाच्या निर्णयाप्रमाणे घटस्थापनेच्या दिवसापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर व समितीच्या अखत्यारीत असलेल्या परिवार देवतांची मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहेत. मात्र शासनाच्या नियमाप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सध्या सुरु करण्यात येणार नसून फक्त मुखदर्शन सुरू करण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याच बरोबर पंढरपूर शहरातील नागरिकांना सकाळी सहा ते सात या वेळेत आधार कार्ड पाहून दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. दररोज 5000 ऑनलाईन बुकींग व 5000 स्पाॅट बुकिंग असे एकूण दहा हजार भाविकांना सकाळी 7 ते रात्री 10 यादरम्यान दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
ज्या दिवशी ऑनलाईन बुकींगची संख्या कमी असेल त्यादिवशी तेवढे स्पाॅट बुकिंग वाढवून दर्शन देण्यात येणार आहे. याच बरोबर 65 वर्षाच्या वरील व्यक्ती, दहा वर्षाखालील मुले, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांनी दर्शनासाठी न येता लाईव्ह दर्शनाचे लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल्स स्क्रीनिंग, ऑक्सीजन पातळी तपासणी, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका याची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. याच बरोबर मंदिर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून कोवीड तपासणी करण्यात येत आहे. पददर्शन सुरू करण्यात येणार नसल्यामुळे मंदिर समितीच्या वतीने सध्यातरी भाविकांना कोणत्याही प्रकारची पूजा उपलब्ध करून देण्यात आली नाही. तसेच मंदिरात हार – फुले, प्रसाद घेऊन जाण्यास देखील मनाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.