सोलापूर : डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी सद्दाम हाकीम पिरजादे (वय-३०,रा. संगमेश्वर नगर,अक्कलकोट रोड,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरुन शफिक उर्फ गुड्डू चाँदपाशा पटेल (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी सद्दाम पिरजादे यांच्या राहत्या घरातील संशयित आरोपी शफिक उर्फ गुड्डू चाँदपाशा पटेल याने फिर्यादीच्या बहिणीस त्याच्याकडे नांदवायला पाठवत नाही व त्यास फिर्यादीची आई जबाबदार आहे. या रागातून फिर्यादीची आई मुमताज फाएजा यांच्या डोक्यात लोखंडी रॉड व पारणे मारून गंभीर जखमी करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनगार हे करीत आहेत.
* दोन लाख चाळीस हजाराची फसवणूक
सोलापूर : एका तरुणाची दोन लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुजाहिद नजीर अहमद (वय-२७,रा. चिक्कळळी नगर,अक्कलकोट रोड,सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून प्रवीण अमनची (वय-३५) व मनीष दंतकाळे (वय-४५, दोघे रा. गृह फायनान्स लिमिटेड,सोलापूर शाखा, एचसीसी कॉम्प्लेक्स,त्रिपुरसुंदरी समोर, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी मुजाहिद यांनी घर बांधकामाकरिता गृह फायनान्स लिमिटेड सोलापूर शाखा यांच्याकडून फायनान्सचे एजंट संशयित आरोपी प्रवीण अमनची व व्यवस्थापक संशयित आरोपी मनीष दंतकाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी फिर्यादी यांना दहा लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो त्यासाठी इतर खर्च म्हणून फिर्यादीकडे रोख रक्कम १ लाख ४० हजार रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी मुजाहिद अहमद यांनी वरील दोघा संशयित आरोपींना रक्कम दिली. परंतु त्याच्या पावत्या दिल्या नाहीत तसेच हिशोबही दिला नाही.
फिर्यादीने कर्जापोटी वेळोवेळी आरोपी यांच्या वतीने हप्ते भरणे करिता रक्कम एक लाख रुपये दिले होते. मात्र ती रक्कम कर्ज खात्यापोटी आरोपीने न भरता परस्पर स्वतःच्या हिताकरिता वापरले. एकमेकांच्या संगनमताने फिर्यादीची २ लाख ४० हजाराची फसवणूक करून आर्थिक अफरातफर केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस नाईक मुजावर हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मृत्यूस कारणीभूत ; कार चालकाविरुद्ध गुन्हा
सोलापूर : मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एका कार चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेक्सा शोरूमच्या विरुद्ध बाजूस सोलापूर पुणे हायवे रोडवर घडली. याप्रकरणी गोरख हरिदास पवार (वय-३८,रा.बेबीदारफळ,उत्तर सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून एम.एच.१४.ई.सी ८१५५ या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कारमधील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवत होतो. त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ अनील हरिदास पवार हा सोलापूरकडून बीबी दारफळच्या दिशेने आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.४२ आर.८२६० या वाहनावरून जात असताना पाठीमागून वरील क्रमांकाच्या कारने धडक देऊन अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. तसेच कार चालक याने अपघाताची खबर पोलिसांना न देता व फिर्यादीच्या भावाला उपचारास घेऊन न जाता पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून,या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंडले हे करीत आहे.
* जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी
सोलापूर : आमच्या सोसायटीतून नळ कनेक्शन द्यायचे नाही या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेणुका नगरी जुळे सोलापूर येथे घडली.याप्रकरणी विठ्ठल नामदेव कोरे (वय-५१,रा. शांती नगर,विजापूर रोड,सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून हुसेन बाशा मुजावर व त्यांची पत्नी,गणेश जाधव व त्यांची पत्नी,जावेद लालू पटेल (सर्व.रा.रेणुका नगरी सोसायटी,जुळे सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांनी नवीन खरेदी केलेल्या रेणुका नगरी (आय) सोसायटी मधील घर नं.३८७ येथे महापालिकेकडे पाण्याचे नळ कनेक्शन घेत होते.त्यामुळे वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी व महापालिकेकडील खोदाई करणाऱ्या कामगाराला तुम्ही आमच्या सोसायटीमधून नळ कनेक्शन द्यायचे नाही, असे म्हणून खोदाई करणाऱ्या कामगाराला पळवून लावले. त्याचवेळी हुसेन बाशा मुजावर व गणेश जाधव यांनी जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुजावर व जाधव यांच्या पत्नीने तुमच्यात दम असेल तर स्वतःच्या पैशाने नळकनेक्शन घ्या, असे म्हणून फिर्यादी यांना अर्वाच्य शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त टिपरे करीत आहेत.