विरवडे बु : हराळवाडी (ता. मोहोळ )येथे मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री हरी धोडमिसे या शेतकऱ्यांच्या शेताजवळील गायरानात बिबट्या सदृश्य प्राण्याने श्वानावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. वनविभागाचे अधिकारी थोरात यांनी परिस्थितीची पाहणी करून ठसे घेऊन ठसे पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्या सदृश या प्राण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हराळवाडी शिवारात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने याच परिसरात बिबट्या लपून बसला असेल म्हणून कोणीही शेतकरी शेताकडे जाण्यास तयार नाही.
वन विभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जीवाची जोखीम घेऊन शेतामध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना आपली सुरक्षा करण्याचे तसेच जनावरांची सुरक्षा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपली जनावरे चारण्यासाठी मोकळी सोडू नये, गोठ्यामध्ये बांधण्याचे तसेच शेतात जाताना किंवा येताना एकटे न जाता समूहाने जाणे तसेच आवाज करत जाणे किंवा मोबाईलवर गाणे लावून जाणे तसेच बिबट्या दिसला तर त्याचा फोटो काढण्यासाठी त्याच्या पाठीमागे जाऊ नये, शेतांत राहणा-यांनी आपल्या घराबाहेरील लाईट चालू ठेवावे, अशा सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्या सदृश्य प्राण्याचे असून ठसे घेऊन तपासणीसाठी पुढे पाठवले आहेत. तपासाअंती आपल्याला समजेल, निश्चित कोणाचे ठसे आहेत. तरी सध्या शेतकऱ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे थोरात (वनविभागाचे अधिकारी) यांनी सांगितले आहे.
* पूर्ववैमनस्यातून उचलून आपटून पाय मोडला
बार्शी : पूर्ववैमनस्यातून एकास उचलून आपटून त्याचा पाय मोडल्याची घटना कारी येथे घडली आहे. याबाबत जखमीची आई शैला सुनिल कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रत्नदीप रामचंद्र कदम याच्याविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीचा मुलगा हर्षद हा सकाळी 11 वाजणेच्या सुमारास गावातील समाज मंदिरासमोर असलेल्या कट्टयावर बसलेला होता. त्यावेळी रत्नदिप कदम हा दारु पिवून तिथे आला. त्याने मागील भांडणाचा राग मनात धरुन हर्षद यास उचलून आपटले व मारहाण केली. त्यामुळे त्याचा पाय फ्रक्चर झाला. यावेळी त्यांना कळल्यानंतर त्या घटनास्थळी गेल्या असता रत्नदीप याने त्यांनाही मारहाण करत तुम्हांला सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.