सातारा : सातारा जिल्हा पोलिस दला अंतर्गत कराड तालुका पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलिस हवालदार संताजी दादू जाधव यांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले. कराड पोलिस वसाहतीमध्ये महिलेला चिठ्ठी लिहून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, चिठ्ठी बहाद्दर पोलिसावरील या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
कराड तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या हवालदार संताजी दादू जाधव याने पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील महिलेशी अश्लिल वर्तन केले होते. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्याचे शासकीय सेवेतून निलंबन केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलीस मुख्यालयातून मिळालेली माहिती अशी की, संताजी जाधव याने पोलीस संकुलात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील महिलेशी मनाला लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारे वागणूक केली होती. ‘तुमचा मोबाईल नंबर द्या’, ‘गपचुप’, ‘आळशी’, ‘वेडी कुठली’ ‘रामकृष्ण हरि’, ‘हो की नाही कळवा’ या मजकुराच्या चिठ्ठया दिल्या होत्या. यामुळे त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात २२ जुलै रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस खात्याची प्रतिमा अत्यंत मलीन केली, पदास अशोभनिय लांच्छनास्पद गैरवर्तन करुन अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर एसपी सातपुतेंनी शिस्तभंगाची कारवाई केली. जाधव याला शासकीय सेवेतून निलंबित केल्याचे तसेच पोलीस मुख्यालय येथे हजेरी लावण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.