सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला.तीन विरुद्ध एक अशा मताने मंजूर करण्यात आला. मात्र यावेळी माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांना काही जणांनी बेदम मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीसांकडे केली आहे. पंचायत समितीसमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ठिकाणी दोन गटांमध्ये मारामारी झाल्याची माहिती आहे. याठिकाणी इंद्रजित पवार व भाजप तालुकाध्यक्ष आप्पास कदम हे आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांसह परिसरात थांबून होते, बराच गोंधळा नंतर पोलिसांचा ताफा दाखल झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सकाळी ११:३० वाजता रजनी भडकुंभे यांच्या विरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावावर पिठासीन अधिकारी हेमंत निकम यांच्यासमोर मतदान झालं. पीठासन अधिकारी निकम यांनी अविश्वास ठरावाबाबत हात उंचावून मतदान घेतले. त्यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने तीन सदस्यांनी हात वर केले तर विरोधात एक सदस्यांनी हात वर केला. त्यामुळे भाजपच्या सदस्य संध्याराणी पवार, राष्ट्रवादीचे सदस्य जितेंद्र शीलवंत, माजी आमदार दिलीप माने गटाचे सदस्य हरिदास शिंदे या तिघांनी एकत्र येऊन दाखल केलेला अविश्वासाचा ठराव तीन विरुद्ध एक अशा मताने मंजूर करण्यात आला.
चार सदस्य संख्या असलेल्या उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या या सभागृहात सभापती भडकुंबे यांच्या विरोधात तीन सदस्यांनी एकत्र येत आठ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. तो ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी सभापती भडकुंबे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही. एवढेच नाही तर माजी आमदार दिलीप माने यांनीही या अविश्वासाच्या ठरावासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे अविश्वास ठराव बारगळणार की होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र आज सकाळी साडेअकरा वाजता सभापती भडकुंबे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे भडकुंबे यांनी केलेले प्रयत्न तोकडे ठरल्याचे आजच्या घडामोडी वरून दिसून येते.