बार्शी : येथील बारामती सहकारी बँकेकडे 3 कोटी रुपयांच्या कर्जापोटी तारण ठेवण्यात आलेल्या जमिनीची, बँकेचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तयार करुन ते सह दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल करुन विक्री केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी नगरसेवक सोमनाथ रमाकांत पिसे याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत पिसेसह सतीश श्रीमंत आरगडे (रा. तावडी ता. बार्शी), आबासाहेब शामराव जराड (रा. उपळाई रस्ता, बार्शी), अनिल दिलीप वायचळ (रा. लक्ष्मीनगर, लातूर रस्ता, बार्शी ) संजय विलास आरगडे (रा. तावडी ता. बार्शी) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पिसेचा अटकपुर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. याबाबत या जमिनीतील हक्क धारक अजिंक्य श्रीकांत पिसे याने फिर्याद दिली आहे.
अजिंक्य पिसे यांच्या कुटुंबियांच्या बार्शी तालुक्यात एकूण 161 मिळकती आहेत. त्यापैकी गट नं. 514/1 ही मिळकत त्याचे चुलते सोमनाथ रमाकांत पिसे रा. सुभाषनगर, तळेवाडी, बार्शी याने कुटुंबियांच्या परस्पर बारामती सहकारी बँकेकडे तारण ठेवून तीन कोटी रुपयांचे कर्ज उचललेले आहे. सदर कर्ज थकीत असून सोमनाथ पिसे यांच्याकडून बँकेला सुमारे सव्वा दोन कोटी रुपये येणे असताना सोमनाथ पिसे हा ही जमीन विकण्याच्या प्रयत्नात होता.
याची कुणकुण अजिंक्य पिसे यांना लागताच त्यांनी बँकेला याची कल्पना दिली. त्यामुळे बँकेने सह दुय्यम निबंधक कार्यालयास सदरील जमीन कर्जापोटी तारण असल्याने बँकेच्या ना-हरकती शिवाय त्याबाबतचे व्यवहार नोंदवू नये, असे कळविले. त्यामुळे सोमनाथ पिसे याने इतर अरोपींशी संगनमत करुन सदर तारण जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी बँकेचे लेटरहेड तयार करुन बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तयार केले. त्याआधारे त्याने ही जमिन वरील चौघांना विकली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणात वापरण्यात आलेले बँकेचे बनावट लेटरपॅड, बनावट शिक्का कोठे तयार करण्यात आला. यात आणखी कोण-कोण सामील आहेत. याचा तपास करण्यासाठी पिसे याला पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद शासकीय अभियोक्ता सुनिल जोशी यांनी केला. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी मंजूर केली.
* श्रीपूर पोलिसांनी चंदन चोरास केली अटक
श्रीपूर : श्रीपूर औट पोस्ट हद्दीत पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना दोन इसम जांबुड या गावाकडून बोरगावकडे मोटार सायकलवर निघाले असुन त्या दोघांच्या मध्ये पांढरे रंगाचे पोत्यात काही तरी संशयास्पद असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.
यावरुन पोलीसांनी सापळा लावून त्या दोघांना मोटार सायकलसह बोरगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ अडवून सतिश फकिरा साठे, सतिश अजिनाथ साठे (दोघे रा.बोरगाव ता.माळशिरस) यांचे जवळील पोत्यामध्ये २० किलो वजनाच्या २०,०००/- रू. किंमतीचे दोन मोठे चंदनाची ओले ओंडके मिळून आले. त्यांच्या विरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. प्रथम वर्ग न्यायालय, माळशिरस मध्ये हजर केले असता त्यांना एक दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, तेजस्वी सातपुते , उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, ,पोलीस निरीक्षक, अरूण सुगावकर अकलूज पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शननाखाली परि.मपोसई स्वाती कांबळे, हे ए.एस.आय /पानसरे, पोहेकाँ किशोर गायकवाड, पोना संजय चंदनशिवे, पोना अमित यादव यांनी केली असून गुह्याचा पुढील तपास पोहेकाँ किशोर गायकवाड हे करीत आहेत.