नवी दिल्ली/ जयपूर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील सरकारी मेडिकल कॉलेज आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील काही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानने जिंकल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात युएपीए कलम लागू करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी केली जात आहे.
संतापलेल्या काही विद्यार्थ्यांनी पंजाबच्या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर आपला राग काढला. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली तसंच हॉस्टेलच्या रुममध्ये तोडफोडही करण्यात आली. काश्मिरी विद्यार्थ्यांनी भारताच्या पराभवाचं सेलिब्रेशन केल्याचा आरोप करण्यात येतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, भाई गुरदास इंस्टीट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थी भारत-पाकिस्तान सामना पाहत होते. त्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर कथितरित्या हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही बाजूने किंवा कॉलेज व्यवस्थापनाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षिकेनं पाकिस्तानच्या विजयानंतर व्हॉट्स ऍप स्टेटस टाकत आनंद व्यक्त केला. या शिक्षिकेला खासगी शाळेनं नोकरीवरून कमी केलं आहे. एका उच्च शिक्षित, शिक्षिका असणा-या महिलेने असे कृत्य करणे अशोभनीय आहे. शाळेत अप्रत्यक्ष , अप्रत्यक्षपणे देशप्रेम, सामाजिक व्यवहार, सोशलमीडिया कसा वापरावा याचे ज्ञान दिले जाते. त्यानेच असे कृत्य केल्याने शिक्षिकेवर टीका होत आहे.
उदयपूरमधील नीरजा मोदी शाळेत शिक्षिका असलेल्या नफीसा अटारी यांनी भारत-पाकिस्तान सामन्यानंतर व्हॉट्स ऍप स्टेटस ठेवलं. ‘जीत गये, आम्ही जिंकलो’ अशा आशयाचं स्टेटस अटारी यांनी ठेवलं होतं. अटारींनी स्टेटसला ठेवलेल्या फोटोत पाकिस्तानचे सलामीवीर दिसत होते. तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देता का असा सवाल एका विद्यार्थ्याच्या पालकानं नफीसा यांना स्टेटस पाहून विचारला. त्यावर त्यांनी होय असं उत्तर दिलं.
नफीसा अटारी यांनी ठेवलेल्या स्टेटसचा स्क्रीनशॉट काही विद्यार्थ्यांनी काढला. त्यानंतर तो व्हायरल झाला. अटारी यांनी ठेवलेल्या स्टेटसची नीरजा मोदी शाळेच्या प्रशासनानं दखल घेतली. त्यांना निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. यासंबंधीचं पत्र प्रशासनाकडून जारी करण्यात आलं आहे. सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टमधील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नफीसा अटारी यांना निलंबित करण्यात येत आहे, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. भारतात राहून अशा प्रकारचे कृत्य केल्याने टीका होत आहे.