मोहोळ : शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही महाविकास आघाडीमध्ये मोहोळ तालुक्यातील आमदार यशवंत माने हे शिवसैनिकांची कामे करत नाहीत, शिवसेनेच्या गावांना निधी दिला जात नाही, त्यामुळे आमदार यशवंत माने यांचा मोहोळ शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
मोहोळ येथील रेस्ट हाउसवर जिल्हाप्रमुख दादासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांच्या एका गटाची बैठक पार पडली. यावेळी रामहिंगणेचे बाळासाहेब वाघमोडे भांबेवाडीचे केशव वाघचौरे कोळगावचे नामदेव केवळे पोखरापूरचे आशिष आगलावे मुंडेवाडीचे राहुल व्यवहारे मोहोळ शहर प्रमुख विक्रम विक्रम देशमुखउपशहर प्रमुख जहीर खैरादी पेनुरचे संदीप चवरे हिगणीचे गणेश झेंडगे चिंचोली काटीचे कयुम शेख कोरवलीचे सिद्धाराम म्हमाणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी तालुका नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील शिवसेनेचे नेते मंडळीही ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील शिवसैनिकांच्या विरोधी पार्टीच्या गटाला सपोर्ट करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात प्रामाणिकपणे लढणाऱ्या शिवसैनिकांचे खच्चीकरण होते, तरीही मोहोळ तालुक्यातला शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे तो न डगमगता पक्षांमध्ये ठामपणे उभा राहिलेला दिसून येत आहे, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते बाळासाहेब वाघमोडे यांनी व्यक्त केले.
तालुकाप्रमुख मोहोळ तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांना बैठकीचे निमंत्रण देत नाहीत. आम्ही मागील २५ वर्षापासून शिवसेनेचे काम करत आहोत तरी आम्हाला निष्ठावान म्हणून समजले जात नाही. अनेक नेते मंडळी राष्ट्रवादीतून परत माघारी आली आणि परत शिवसेनेचे काम करू लागली, परंतु आम्ही पहिल्यापासूनच शिवसेनेमध्ये असलो तरी आम्हाला निष्ठावान समजले जात नाही, अशी खंत कोळेगावचे माजी सरपंच नामदेव केवळे यांनी व्यक्त केली. तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार म्हणाले की, आगामी सर्व निवडणुकीत निष्ठावंताना विश्वासात घेतले पाहिजे आणि निवडणुका लढताना ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरच लढाव्यात ही आमची प्रमुख मागणी, आहे असे ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* ऊस तोडीचे मजूर पुरविण्यासाठी पावणे सात लाख रुपये घेवून फसवणूक
बार्शी : ऊस तोडीचे मजूर पुरविण्याची खात्री देवून वारंवार पैसे घेवून मजूर न पुरविता पैसे माघारी न देवून पावणे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुकादम गणेश काळुराम राठोड (रा. म्हैसमाळ पो. बेलोरा ता. पूसद जि. यवतमाळ) व बाळकृष्ण प्रकाश पवार (रा. पिंपळगाव ता. मंगरुळपीर जि. वाशीम ) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वाहतूक ठेकेदार सतिश गणपत हजारे (रा. पानगाव ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
सतीश हजारे यांनी जुन 2020 मध्ये बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि. (आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.युनिट-2) ईडा जवळा(नि) ता. भूम जि. उस्मानाबाद या कारखान्यासोबत आपल्या ट्रकमधून ऊस वाहतूकीचा करार केला होता. त्यामुळे ऊसतोड मजूर मिळण्यासाठी त्यांनी गावातील विजय निवृत्ती काळे व अभीजीत बिभीषण काळे यांचे ओळखीने ऊसतोड कामगारांचे मुकादम असलेल्या आरोपींशी संपर्क केला.
त्यांनी 1 टोळी (10 जोड्या) देतो असे सांगून प्रत्येक जोडीस 60,000/- रु. उचल व मुकादम यांना 75000/- रु कमिशन असा व्यवहार ठरविला. त्यानंतर त्यांना मागेल तसे वारंवार पैसे पुरविले. त्यांनी कामगार पुरविण्याची खात्री देवूनही शेवटी हात वर केले. मजुरही पुरविले नाहीत आणि पैसे ही परत दिले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.