सोलापूर : कोविड लस ही कोरोना आजाराविरुद्ध रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी दिली जाणारी लस आहे. मात्र ही अत्यावश्यक असणारी लस मृत माणसाला दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाइकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथे घडली आहे. वैरागमध्ये चक्क मृत व्यक्तीच्या नावावर कोरोनाच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे. आरोग्य खात्याने मेलेल्या व्यक्तीला डोस देऊन अप्रत्यक्षरीत्या जिवंतच दाखविण्याची चूक केली आहे.
यशोदा बाबासाहेब धावारे (वय ६२) यांनी १२ मार्च २०२१ रोजी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा पहिला डोस घेतला. मात्र त्यांचे २५ जून २०२१ रोजी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. निधनानंतर तब्बल १११ व्या दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीचा दुसरा डोस दिल्याचा अधिकृत संदेश नातेवाइकाच्या मोबाईलवर आला. या प्रकारामुळे नातेवाईक गोंधळले आणि एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीला दुसरा डोस देण्याचा प्रताप आरोग्य विभागाने केला आहे. संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाइकांमधून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृताच्या नावे बोगस व गैरकृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आमच्या माणसाचा आम्ही आपल्या हाताने अंत्यविधी केला; तरीही त्यांनी लस कशी घेतली, असा प्रश्न नातेवाइकांकडून विचारला जात आहे.आरोग्य विभागाच्या या प्रकारामुळे नातेवाइकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मृत व्यक्तीच्या नावावर लसीकरण नोंदणी कोणी केली? नोंदणी करून ती लस नेमकी कोणाला दिली? उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तर मृत व्यक्तीच्या नावावर लसीकरण उरकले जात नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण केले जात आहेत.
* गावी गेल्याचा फायदा घेऊन चोरट्याने मारला डल्ला
सोलापूर : घराला कुलूप लावून गावी गेल्यावर कोणीतरी अज्ञात चोरट्याने घर फोडून २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.१८ ते २४ ऑक्टोंबर दरम्यान रजनी प्लाझा जुळे सोलापूर येथे घडली. याप्रकरणी विमल सुभाष सापटणेकर (रा.रजनी प्लाझा,पतंजली मॉलच्या समोर,जुने संतोष नगर,जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी विमल या घराला कुलूप लावून पुणे येथे मुलाकडे गेल्या होत्या.त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.त्यानंतर घरातील दीड हजार रुपये किमतीची नाकातील सोन्याची नथ, तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट व १७ हजार रुपये रोख रक्कम असा मिळून एकूण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक कांबळे हे करीत आहेत.
* पैशासाठी विवाहीतेचा छ्ळ,चौघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : माहेरहून एक लाख रुपये आण म्हणून संकल्पा कांबळे या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पती संदेश बाळकृष्ण कांबळे (वय २९), सासरा बाळकृष्ण कांबळे, सासू मंदाकिनी बाळकृष्ण कांबळे,दीर संकेत बाळकृष्ण कांबळे (सर्व रा.राऊत वस्ती, भोसरे, कुर्डवाडी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी संकल्पा संदेश कांबळे (वय २९. सध्या रा. सिद्धार्थ सोसायटी, उत्तर सदर बझार) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. लग्नात मनासारखा रूखवत दिला नाही म्हणून लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत नूमद आहे.
* चोरट्याने ४ लाखांच्या तांब्याच्या तारा पळविल्या
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील कंपनीतून अज्ञात चोरट्याने चार लाख रुपयांच्या तांब्याच्या तारेची चोरी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष हनुमंत उन्हाळे (वय-४०,रा.पोखरापूर,ता.मोहोळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.यात म्हटले आहे की,उन्हाळे यांची कोंडी येथे कंपनी आहे.त्या कंपनीच्या भिंतीवरून अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश केला व मशिनला जोडलेली चार लाख रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली.याचा पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
* शेतीच्या वादातून लाकडाने मारहाण
सोलापूर : शेतात काम करणारे सखू शिवाजी बन्ने (वय-३८,रा. गवंडी गल्ली, उत्तर कसबा) यांना शेतीच्या वादातून देवीदास बन्ने व इतर ४ जणांनी लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यात सखू यांच्या डोक्यास मार लागून ते जखमी झाले. जखमीस तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.