अक्कलकोट – अट्रासिटी प्रकरणातील पिडीत कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याची थाप मारून मनोधैर्य योजनेतून मिळालेला मदत निधी धनादेशाद्वारे स्वतःच्या खात्यावर वळवणा-या वकिलाच्या वाढीव पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या अटकेतील वकिलांनी पोलीसांना तपासकामात अजिबात सहकार्य केले नसल्याने कुठल्याही प्रकारची रक्कम व कागदपत्रे हस्तगत करु शकलो नसल्याचे माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली. या प्रकरणातील दुसरा वकिलांचे सोलापूर शहर व इतरत्र ठिकाणी पोलिसांनी शोधाशोध करून देखील अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.
अॅड. विवेक शाक्य असे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वकिलाचे नांव असून यापूर्वी मंजूर झालेल्या दोन टप्प्यातील पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी (ता. २६) त्याला वळसंग पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याप्रकरणातील दुसरा आरोपी अॅड. तानाजी शिंदे हा अद्यापही फरार असून त्याचा पोलिसांनी सोलापूर शहर व इतरत्र ठिकाणी शोध घेऊन देखील त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
* बनावट गायछाप तंबाखू तयार करणाऱ्या दोघांना अटक
सोलापूर : बनावट गायछाप तंबाखू तयार करून त्याची विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि गोंदिया येथील दोघांना अटक करून ३ लाख २५ हजाराचा माल जप्त केला. अटकेतील दोघा आरोपींना मोहोळच्या न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
हिमांशू गुप्ता (वय २८ रा.आग्रा, उत्तर प्रदेश) आणि रमेश वासुदेव गुप्ता (वय५५ राहणार गड्डा टोळी, गोंदिया) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत
गेल्या महिन्यात कुरूल (ता.मोहोळ) येथील एका किराणा दुकानात बनावट गायछाप तंबाखूची विक्री केली जात असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी मालपाणी ग्रुपचे व्यवस्थापक कैलास सोमानी यांनी कामती पोलिसात फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेत कडून करण्यात आला. बनावट तंबाखूची विक्री करणारा हा आग्रा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी आग्रा (उत्तर प्रदेश) येथे जाऊन हिमांशू गुप्ता गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याने बनावट तंबाखू गोंदिया येथील रमेश गुप्ता यांच्याकडून घेत असल्याचे सांगतिले. त्याप्रमाणे पोलीसांनी गोंदिया येथे जाऊन रमेश गुप्ता याला अटक केली. तेव्हा त्याच्या गोदामात बनावट तंबाखू आणि विविध बनावट विडीचे बॉक्स लेबल आणि इतर साहित्य आढळले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, हवालदार गोलेकर, सलीम बागवान, रवी माने आणि समीर शेख यांनी केली.
* ८० हजाराचे डिझेल चोरले ,झारखंडच्या आरोपीवर गुन्हा
सोलापूर : पापरी (ता.मोहोळ) येथे ८० हजाराचे डिझेल चोरल्याप्रकरणी या पोकलेनच्या ऑपरेटर विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना रविवारी (ता. २४) रात्रीच्या सुमारास घडली. कवलेश्वर तुलसी रविदास (रा.शहापूर, झारखंड) असे आरोपीचे नाव आहे. तो गणेश पाटील (रा. मंगळवेढा) यांच्या पोकलेन यंत्रावर ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्याने रविवारी रात्री दोन बॅरेलमधील मधील ७७६ लिटर डिझेलची चोरी केली, अशी नोंद मोहोळ पोलिसात झाली. हवालदार ढावरे पुढील तपास करीत आहेत.