मुंबई : मुंबई पोलिसांवर सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून टीका करणाऱ्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनेक जणांनी पलटवार करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीतूनही त्यांना उत्तर देण्यात आले आहे. ‘सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही वर्षा बंगला सोडतानाही पाहिला आहे’ असा घणाघात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
‘बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही’ अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते. या ट्वीटवरच अनेकजण व्यक्त होत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘अमृताजी, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना हेच पोलीस बांधव सेवा देत होते आणि आजही तेच सेवा बजावत आहेत. पोलीस बांधव तेच आहेत, ब्रीद तेच आहे आणि कामगिरीही अभिमानास्पद आहे, बदललीय ती फक्त तुमची दृष्टी’ असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.
सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही ‘वर्षा’ बंगला सोडतानाही पाहिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या पोलीस बांधवांवर आपण अविश्वास दाखवत आहात त्यांनी बॉम्बस्फोट, पूर, २६/११चा हल्ला आणि आत्ताच्या कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे.’ अशी प्रतिक्रियाही चाकणकर यांनी दिली आहे.