सोलापूर : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून सोलापूरसह राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या खूपच कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्टी संपल्यानंतर ११ नोव्हेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा उघडणार आहेत. यासाठी काही नियम अटी घालून दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती व गणवेश सक्ती असे निर्बंध नसतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने सांगितली. दिवाळी सुट्टी संपल्यानंतर सकाळी दहा ते सायंकाळी सव्वापाच या वेळेत प्राथमिक शाळा भरतील. पहिलीपासूनचे वर्ग ११ नोव्हेंबरपासून सुरु केले जाणार आहेत. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच पहिले प्राधान्य द्यावे, असे नियोजन केले असल्याचे किरण लोहार, (प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर) यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा पहिलीपासूनचे वर्ग करण्यासंदर्भात राज्यस्तरावरून काही दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याध्यापकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनामुळे राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग मार्च २०१९ पासून पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे ॲन्ड्राइड मोबाईल नाहीत, ते विद्यार्थी मागील दीड वर्षांपासून शिक्षणापासून दूर आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढू नये, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा, शिक्षणाची गोडी कायम राहावी, या हेतूने आता राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरपासून पहिलीच्या पुढील सर्वच वर्ग सुरु केले जाणार आहेत.
दरम्यान, सध्या शहरातील आठवीच्या पुढील वर्ग सुरु आहेत. आता शहरामधील पाचवीपासूनचे पुढील वर्ग सुरु करण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरु आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील पहिलीच्या पुढील वर्ग सुरु केले जाणार आहेत. पालकांनी तशी मागणीदेखील केली आहे. त्याचा विचार करुन तशी नियमावली करीत शाळा सुरु होत आहेत.