पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’ असे वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावतने केलं होतं. देशभरातून कंगनाच्या विधानाचा निषेध व्यक्त केला जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्षांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध कंगनाचे वक्तव्य त्यांना खटकले आहे.
कंगना जे काही बोलली ते चुकीचे होते, पण मोदी सरकारविषयीची तिची भावना काही अंशी बरोबरही आहे, पण त्यासाठी 1947 च्या स्वातंत्र्यावर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिली आहे.
सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली, ” स्वातंत्र्य जर भिकेत मिळेल तर ते स्वातंत्र्य असू शकतं का ? 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले” या वक्तव्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात येते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना कंगना राणावतच्या या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, कंगना राणावतच्या भावना नेमक्या काय आहेत मला माहीत नाही. परंतु तिचे वाक्य पूर्णतः चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर नकारात्मक टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही.
देशात नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव मिळतो. दोन वेळचे जेवण मिळत नाही असा माणूसच आता देशात राहिला नाही. 105 रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे, घरं मिळतायत, स्वच्छतागृह अशी मोठी यादी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2014 नंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर खूष होऊन नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत असेल तर ते बरोबर आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी कंगना राणावतची पाठराखण केली.
सत्ताधाऱ्यांना खुश करण्याच्या नादात कंगनाने असे वक्तव्य केल्यामुळे स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हजारो स्वातंत्र्यवीरांचा, घरादारावर तुळशीपत्र ठेवून देश परकीय जोखडातून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या, तुरुंगवास भाेगलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा नक्कीच अवमान झाला आहे. तिचा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी होत आहे.
तिच्याविरुद्ध देशद्रोहाच्या कलमाखाली जागोजागी पोलीस तक्रारी दाखल होताहेत. तसे पद्म पुरस्कार कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमीच चर्चेत येत असतात. या पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये सिनेमा व खेळात कामगिरी नोंदविणाऱ्यांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे तोकड्या कपड्यांवर बीभत्स नृत्य करणाऱ्या नायिका किंवा नको त्या जाहिराती करून पैसे कमावणारे खेळाडू व कलावंतांनाच का पुरस्कार मिळतात, असे विचारले जाते.
खरे तर या मंडळींकडे पैसा खूप आलेला असतो. त्यांना हवी असते प्रतिष्ठा व ती या पुरस्काराच्या रूपाने मिळत असल्याने त्यासाठी सत्तेजवळ जाण्यासाठी सारे काही करण्याची त्यांची तयारी असते. तेव्हा कंगना किंवा गेला बाजार अन्य कुणामुळे तरी या पुरस्कारांची बेअदबी होत असताना केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये जो नवा स्तुत्य पायंडा पाडला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको, असेच बोलले जात आहे.