अमरावती : त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनांचा निषेध करण्यासाठी काढलेल्या मोर्चात शुक्रवारी हिंसाचार झाला. त्यानंतर आज शनिवारी भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला. यानंतर प्रशासनाने अमरावतीमध्ये 144 कलम लागू केले आहे.
जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर आणि सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील इतवारा भागात आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नवरात्र उत्सवादरम्यान बांगलादेशात हिंदुंचे शिरकाण करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधात त्रिपुरा येथे मोर्चा काढण्यात आला. त्रिपुरातील मोर्चावरून सोशल मिडीयावर अफवा आणि बनावटी मॅसेज फिरवण्यात आले. त्यातूनच हा प्रकार घडला. अमरावती येथे शुक्रवारी घडलेल्या घटनांच्या विरोधात आयोजित मोर्चादरम्यान शनिवारी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातील राजकमल चौक, नमुना गल्ली, अंबापेठ या भागात दुकाने व वाहनांची जाळपोळ, तोडफोड झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.
आज शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्ते राजकमल चौकात दाखल झाले. राजकमल चौकातील मुख्य बाजारपेठ बंद करीत मुस्लिम बहुल परिसर असलेल्या इतवारा भागात आंदोलन कर्त्यांनी मोर्चा वळविला. या परिसरात काही गाड्यांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुकाने बंद करावेत, अशी मागणी आंदोलकांकडून केली. आंदाेलकांच्या हातात काठ्या असून जोरदार घोषणाबाजी करीत काही गाड्या व दुकानांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.
“शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. याबाबत राज्य सरकार योग्य ती कारवाई करेलच मात्र या घटनेचा काही घटक राजकारणासाठी करत आहेत. जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी.”
ॲड. यशोमती ठाकूर – पालकमंत्री