पंढरपूर : एसटीचे राज्य शासनात विलनीकरण केले तर राज्यातील सर्वच महामंडळातील कर्मचारी देखील विलनीकरण करण्याची मागणी करतील. विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. आज एसटीचे विलनीकरण केले तर उद्या अंगणवाडी सेवीका, आरोग्य सेविका व कोतवाल, पोलीस पाटीलही विलनीकरणाची मागणी करुन शकतात. यांचा विचार करुन एसटी कर्मचार्यांनी तुटेपर्यंत तानू नये, संप मागे घ्यावा, असे आवाहन करत एसटीचे विलनीकरण शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपुरात सांगितले.
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी अजित पवार पंढरपूरात आले होते. महापूजेनंतर मंदिर समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, गेल्या 60 वर्षात कधी एसटीच्या विलनीकरणाचा मुद्दा समोर आला नव्हता. सद्या तर देशपाातळीवरील एअर इंडिया ही कंपनी केंद्र सरकारने खासगी केली व विकली आहे. त्यावर कोणी काहीच बोलत नसल्याची टिका भाजपवर करत सत्तेपासून दूर राहिलेला विरोधी पक्ष मुद्दामहून विलनीकरणाचा मुद्दा चिघळवत आहे. विविध मुद्दे काढून विरोध पक्ष विलनीकरणाचा मुद्दा चिघळवत आहे. विविध मुद्दे काढून विरोध पक्ष राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एसटी महामंडळ हे त्यांचे काम करत आहे. राज्य सरकारने दिड हजार कोटीची मदत केली. शक्य असेल ती मदत राज्य सरकार करत आहे. त्यामूळे एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या करण्यांचा विचार मनास स्पर्श करु देवू नये.
प्रवाशांचाही विचार करावा लागतोय, कर्मचा-याचाही विचार करावा लागत आहे. महागाई वाढत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे अजित पवार यांनी सांगीतले.
यावेळी पेट्रोल व डिझेलवरील राज्याचा कर कमी करण्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामूळे राज्याला सद्यातरी उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. पगार व दैनंदिन खर्च तसाच आहे. याचा विचार करता पेट्रोल व डिझेल वरील राज्याचा कर कमी केला जाणार नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल, हे पाहूनच निर्णय घेतला जाणार आहे. एसटीसंपाबाबत अनिल परब व सरकारमधील मंत्री तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगीतले.
* विक्रम गोखले यांना काय बोलताय याचे भान नाही-
विक्रम गोखले यांनी कंगना राणावत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. याबद्दल विचारले असता , पवार म्हणाले की, मत मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र, आपण काय बोलतोय, त्याबद्दल काहीतरी भान ठेवायला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेले आहे. हे विसरता कामा नये. असा टोलाही अजित पवारांनी लगावला.