सोलापूर : पंचवीस दिवसांच्या बाळाच्या खुनाच्या आरोपावरुन पोलिसांनी त्याची आई प्रतीक्षा संकेत सुरवसे (वय २१, रा. मंगळवेढेकर चाळ, प्रभात टॉकीजमागे) हिला अटक केली आहे. तिला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली.
मंगळवेढेकर चाळीत १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये प्रतीक्षा हिच्या बाळाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
पोलिसांनी तपास करून या बाळाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याबाबत फौजदार अश्विनी काळे यांनी फिर्याद दिली होती. या बाळाचा खून नेमका कोण व कशासाठी केला? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. पोलीस घरातील व्यक्ती तसेच अन्य लोकांचीही चौकशी करीत होते. परंतु पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांनी बाळाची आई प्रतीक्षा हिनेच खून केल्याच्या आरोपावरून तिला अटक केली. तिला शुक्रवारी (ता. १९) न्यायदंडाधिकारी एम. एम. बावरे यांच्यासमोर उभे केले. प्रतीक्षा हिने बाळाचा खून कशासाठी केला याचा तपास करावयाचा असल्याने पोलिसांनी चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु तिला न्यायालयाने एक दिवसाच पोलीस कोठडी दिली आहे.
यात आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र फताटे हे काम पाहात आहेत.
* समुद्रातील मासा चावल्याने तरुण जखमी
सोलापूर : गोवा येथील बागा बीच येथे समुद्रात पोहताना जेलीफिश चावल्याने प्रथमेश प्रभाकर बोधले वय १८ (रा.वज्रेश्वरी नगर सोलापूर) हा तरुण किरकोळ जखमी झाला ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. त्याला गोवा येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.