मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना अटक करता येणार नाही. मात्र सिंग यांना सीबीआयसमोर हजर होत चौकशीत सहकार्य करावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
तसेच सिंग हे भारत देशातच आहे, फरार नाहीत, पुढल्या 48 तासात सीबीआयसमोर हजर राहण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती सिंग यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच आहेत, असा दावा त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. तसेच परमबीर फरार नसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून सुरक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आधी परमबीर सिंग भारतात आहेत की, जगाच्या कोणत्या भागात आहे, याची माहिती सांगा, नंतरच सुरक्षेसंबंधी विचार केला जाईल, असे कोर्टाने म्हटले होते.
यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. सुनावणी अंती न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुलीचा आरोप करणारे आणि सध्या गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. मागील सुनावणी वेळी न्यायालयाने परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल करत त्यांचा ठिकाणा विचारला होता. त्यावर वकिलांनी ते भारतातच असल्याचं सांगितलं.
परमबीर सिंह यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर न्यायालयाने त्यांच्याबद्दल माहिती विचारली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी त्यांच्या वकिलांनी परमबीर सिंह नेपाळमार्गे देशाबाहेर गेल्याची माहिती चुकीची असल्याचं सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“माझ्याजवळ डीजीपींची ऑडिओ टेप आहे, ज्यामध्ये माजी गृहमंत्र्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यास सांगितलं आहे. ते मला धमकी सुद्धा देत आहेत. तक्रार आणि खटले मागे घेतले नाही, तर माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे”, असं परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सांगितलं.
परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने बाजू ऐकून घेतली. परमबीर सिंह फरार झाल्याच्या वृत्ताबद्दल माहिती घेतल्यानंतर आणि सुनावणीअंती पोलिसांच्या अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण देतानाच चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
* सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य
परमबीर सिंह यांच्या जीवाला मुंबईत धोका आहे. त्यामुळे ते मुंबईपासून दूर आहेत. त्यामुळेच ते मुंबईत जात नाहीयेत, असं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. “हे आश्चर्यकारकच आहे की, मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनाच मुंबईत यायची आणि राहायची भीती वाटते”, असं मत न्यायालयानं नोंदवलं.
न्यायमूर्ती कौल म्हणाले, “माजी पोलीस आयुक्तच त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत आहेत, हे आश्चर्यकारकच आहे.” यावर परमबीर सिंह यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, “सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप केलेला असल्यानेच त्यांना फसवलं जात आहे.”