सोलापूर : मराठा समाजाच्या तुलनेत सर्वच बाबतीत अत्यल्प असलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे सांगत एमआयएमचे प्रमुख खासदार असोसुद्दिन ओवेसी यांनी सोलापुरातील एमआयएम कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. मात्र या मेळाव्यात खासदार ओवेसींनी मुस्लिम बांधवांना चांगला संदेश दिला.
एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. हुतात्मा स्मृती मंदिरात पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत खासदार इम्तियाज जलील आणि अन्य नेतेही उपस्थित होते. फारुक शाब्दी यांनी त्यांच शहरवासियांच्यावतीन स्वागत केलं. हा मेळावा बंदिस्थ सभागृहात पुर्व परवानगीनं झाला.
भाजप आणि शिवसेनेवर त्यांनी कडवी टिका केली. सोलापुरात पाच दिवसाआड पाणी दिले जाते. पाणी आणि आरक्षण न देणाऱ्यांना आता घरी बसवा, असेही आवाहन त्यांनी केले. मराठा समाजाकडे काय आहे याची टक्केवारी दिली आणि मुस्लिम समाजाकडे तुलनेत काहीच नाही हे दर्शवत आरक्षणाची मागणी ओवेसी यांनी केली.
अमरावती दंगलीवरूनही महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. या सरकारला कायदा व सुव्यवस्था राखता येत नसल्याचे सांगितले. आपले घोटाळे व परिवार वाचविण्यासाठी शिवसेनेबरोबर सरकार केल्याचीही टिका केली.
महाराष्ट्रातील मुसलमानांच्या आरक्षणासाठी 27 नोव्हेंबरला ‘चलो मुंबई’ हा मोर्चा होणार होता. मात्र आता 11 डिसेंबरला ‘चलो मुंबई’ची रॅली निघणार. वक्फच्या जमिनी आणि मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा कार्यक्रम 11 डिसेंबरला होणार आहे”, अशी घोषणा ओवेसी यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही खासदार ओवेसींनी सडकून टीका केली. “धरणात पाणी नाही तर मुतू का? म्हणणाऱ्याला डोकं नसेल, पण मला आहे”, असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुनही निशाणा साधला.
“कोणी मुसलमान जर एमआयएममध्ये गेला असता तर त्याला गद्दार म्हणून वागणूक दिली गेली असती. मात्र अजित पवार भाजपसोबत जाऊन आले. त्यांच्या पक्षात घरातल्या लोकांना वेगळी वागणूक दिली जाते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये नवरदेव कोण होतं ते माहिती नाही. पण राष्ट्रवादीचे अजित पवार 48 तासांचे नवरदेव बनले होते”, असा टोला लगावला.
महा विकास आघाडीच्या कारभारावर खा. ओवैसी यांनी संताप केला आहे. शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी विचारला. या सरकारवर विश्वास काही ठेवू नका. आता आपल्याला बदलावे लागणार आहे. या सत्ताधाऱ्यांना ओळखावे लागणार आहे. आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी सेक्युलरिझमचे हत्यार काढण्यात आले. मुस्लिमांना आमिष दाखवण्यात येते. आमच्या भावनांचा आदर ठेवला जात नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे सुरु आहे. याचे वाईट वाटते. मुस्लिमांच्या आरक्षणाचा विसर पडला. आता गोष्ट वानखेडेंची सुरु आहे. मुस्लिम बांधवांनो खिशात पेन ठेवायला शिका तलवार नव्हे तर कलमच आपल्याला जिवंत ठेवेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती.
* खासदार ओवेसींनी पोलिसांचा हिसका
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद ए मुस्लिमीनचे म्हणजेच (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीला नंबर प्लेट नसल्यानं सोलापूर वाहतूक पोलीसांनी विश्रामगृह येथे दोनशे रुपये दंड करुन पोलिसी हिसका दाखवला आहे.
सोलापुरात कायद्याचं राज्य आहे. सारं काही नियमानी चालेल असं बजावण्यात आलं. गाडीला नंबर प्लेट लावल्याशिवाय सभेच्या ठिकाणी जाता येणार नाही असंही बजावण्यात आलं. तेव्हा पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनी वाद न घालता दंड भरून नंबरप्लेट बसविली.