कोलकाता : मेघालयात रात्रीच्या अंधारात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासोबत काँग्रेसच्या 17 पैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी देशपातळीवर काँग्रेसचे अनेक नेते आतापर्यंत फोडले आहेत. ममता या काँग्रेसला कमकुवत करुन भाजपला मदत करत असल्याचा आरोप होतोय. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये आले. त्यात मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. राज्यात ते काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जातात. या प्रवेशानंतर पश्चिम बंगालनंतर मेघालय हे दुसरे राज्य आहे, जिथे तृणमूल काँग्रेसचे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे सभापतींकडे सुपूर्द केले आणि यासोबतच टीएमसीमध्ये सामील होण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे. मुकुल संगमा यांनी सप्टेंबरमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. मात्र, ही बैठक कधी झाली, याबाबत दोन्ही पक्षांनी दुजोरा दिला नाही. मात्र, त्यांची भेट झाल्याचे संगमा यांनी निश्चितपणे सांगितले होते. त्याचवेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हिन्सेंट पाला यांच्यावर मुकुल संगमा प्रचंड नाराज असल्याचीही माहिती समोर येत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सातत्याने पक्षाचा विस्तार करत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत काँग्रेसचे अनेक नेते तृणमूलच्या पक्षात सामील झाले आहेत. काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते देशभरात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यापूर्वी, 23 नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते कीर्ती आझाद, हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि दिग्गज नेते अशोक तंवर, जनता दल (युनायटेड)चे माजी सरचिटणीस पवन वर्मा यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी काल ममता बॅनर्जी नुकत्याच दिल्लीत पोहोचल्या आहेत आणि तिथेच त्यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्षात प्रवेश केला आहे.
मेघालयमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत, त्यापैकी 40 आमदार भारतीय जनता पक्षाच्या समर्थन असलेल्या NDA आघाडीचे आहेत. त्याच वेळी, कॉंग्रेस पक्षाचे राज्यात एकूण 18 आमदार होते, त्यापैकी 12 आमदार आता तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. या आमदारांची संख्या एकूण आमदारांच्या दोनतृतीयांश एवढी आहे. अशा परिस्थितीत या आमदारांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही आणि त्यामुळे आता काँग्रेसऐवजी तृणमूल काँग्रेस मेघालयचा प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.
अशात ममता बॅनर्जी या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यामध्ये अनेकांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदींचीदेखील वेळ मागून त्यांनी भेट घेतली. पण सोनिया गांधींची भेट घेणे टाळले. मागच्या वेळी जेंव्हा त्या दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या तेंव्हा त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर जेंव्हा ममता बॅनर्जी यांना ‘तुम्ही सोनिया गांधींना का भेटला नाहीत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ममतादीदींनी प्रत्येकवेळी मी दिल्लीला आल्यानंतर सोनिया गांधींना भेटणं हे काही ‘घटनात्मरित्या अनिवार्य’ नसल्याचे म्हटले.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काही पत्रकारांनी त्यांना सोनिया गांधींसोबतच्या भेटीबाबत विचारलं. बीएसएफच्या कार्यक्षेतत्राबाबतचा कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत केल्याचं सांगितलं. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणं असो वा गोव्याच्या राजकारणात तृणमूलने प्रवेश करणे असो, या आणि इतर कारणांमुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.