मुंबई : पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. उद्यापर्यंत कर्मचारी कामावर न परतल्यास कारवाईसंदर्भात पुढला विचार करु, असे परब यांनी सांगितले आहे.
मुंबईतल्या आझाद मैदानातील आंदोलनातून आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. तर कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानातील एसटीच्या आंदोलनातून माघार घेत असल्याचे आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. त्यानंतर हा संप मिटला, असे वृत्त होते.
मात्र आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मोठी घोषणा केली आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात आम्ही संप सुरूच ठेवणार, असे कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज जाहीर केले.
सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी माघार घेतली असली तरी हे आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी घोषणा कामगारांनी केली आहे. हा लढा न्यायालयात लढणारे गुणरत्न सदावर्ते यांनी बोलताना म्हटलंय की, कामगाराच्या चाळीस आत्महत्त्या या आत्महत्त्या नसून या इन्स्टिट्यूशनल मर्डर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, सरकारने वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणाबाबत न्यायालय नियुक्त समितीकडून बारा आठवड्यात निर्णय येईल. तो आम्ही मान्य करू. संपकरी कामगारांनी आज आणि उद्या कामावर यावे आम्ही उद्यापर्यंत वाट पाहू अन्यथा संपकऱ्यांवर कडक कारवाई होणार. लोकांना वेठीस धरू नका. बारा आठवडे संप परवडणार नाही, कामगारांनी तुटेपर्यंत ताणू नये, असेही मंत्री परब यांनी आवाहन केले आहे.
गेल्या 15 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी आज गुरुवारी केली असून राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत कामगार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे.
काल बुधवारी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि वेतन हमीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. यासंदर्भात खोत म्हणाले की, राज्य सरकार निधी महामंडळाला वर्ग करेल. महिन्याला 10 तारखेच्या आत पगार मिळेल, असे सांगत सरकार दोन पावले पुढे आले आहे ही स्वागतार्ह बाब आहे.
पहिला टप्पा आम्ही जिंकलो आहोत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला, तर त्यात कामगारांसोबत आम्ही उभे राहू. आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे. त्यात आम्ही कर्मचाऱ्यांसोबत असणार आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच ठेवायची आहे, असेही खोत यांनी सांगितले आहे.
* एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अशी वाढ
– 1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजाराची वाढ
– 10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ.
– 20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा 2 हजार 500 रुपयांची वाढ.