कोल्हापूर/मुंबई/ सोलापूर : कोल्हापूर विभागातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संप तात्पुरता स्थगित केला आहे. आजपासून सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. संप स्थगित झाल्याने जिल्ह्यातील एसटी सेवा आजपासून सुरळीत होणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकात फलाटांवर पुन्हा लाल परी उभी राहिली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूर विभागातील 4,200 कर्मचाऱ्यांपैकी दहा एसटी वाहक-चालक कामावर परतले आहेत. काल शुक्रवारी दहा कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे वैयक्तिक स्तरावर जाहीर करत पाच मार्गावर मार्गस्थ झाले. त्यामुळे मोहोळ, मंद्रूप नळदुर्ग या मार्गावर बस धावली. आजही काही कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर काही मार्गावर बस धावणार आहे. मात्र इतर कर्मचारी संपावर ठाम आहेत.
नागपुरातील एसटी कर्मचारी आजही संपावर ठाम आहेत. नागपूर आगारातून आज सकाळी एकही बस बाहेर पडलेली नाही. एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. त्यामुळे बस स्थानकात आजही शुकशुकाट आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मागण्या मान्य झाल्यास 10 मिनिटात कामावर रुजू होणार असल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. काल 33 रोजनदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात काल 50 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 1 हजार 817 चालक वाहक आणि कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. निलंबित 284 पैकी 130 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्यापही एसटी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे आता सरकारने थेट वाढीव पगार रोखण्याचा दम कर्मचाऱ्यांना दिला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कडक भूमिका घेत पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट, आता सरकारला विचार करावाच लागेल, असा इशारा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एसटी संप अद्यापही सुरु आहे. मात्र, शुक्रवारी 11,549 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एसटीच्या 315 बस रस्त्यावर आज धावल्या. यात शिवनेरी 47 शिवशाही 105 तर साधी बस 163 बस धावण्याच्या एसटी महामंडळाने सांगितल आहे. यामध्ये 594 बस चालक तर 433 बस वाहक कामावर रुजू झाले आहेत. प्रशासकीय सेवेतील 6,973, कार्यशाळेतील 3,549 कर्मचाऱ्यांनी संपात भाग न घेता कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 11 टक्के कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामावर उपस्थिती लावली.
पुण्यातील स्वारगेट आगारात आजही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. लालपरी अजूनही डेपोतचं उभ्या आहेत. फक्त शिवशाही, शिवनेरी आणि खाजगी गाड्या सुरु आहेत. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. स्वारगेट आगारात कर्मचारी फिरकलेच नाहीत.
सरकारच्या वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल 20 हजार कर्मचारी कामावर परतल्याचे आजचे वृत्त आहे. तर आतापर्यंत 3215 कर्मचाऱ्यांना कामावरुन निलंबित करण्यात आलं आहे. तर 1226 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्त करण्यात आली आहे.
सरकार चार पावलं पुढे आलं आणि भरघोस वेतन वाढ दिली आहे. केवळ एका मुद्द्यासाठी जो मुद्दा सरकारच्या हातात नाही. न्यायालयाच्या समितीच्या हातात आहे. अहवाल आल्यावर त्यावर विचार होईल. तोपर्यंत एसटी बंद ठेवणं कर्मचारी, सरकार आणि ग्राहकांना परवडणारं नाही. जेव्हा कामकाज सुरू होईल. तेव्हा छोट्यामोठ्या गोष्टींवर चर्चा होईल. पण, आर्थिक भार सोसायचा आणि एसटी बंद ठेवायची असं होणार नाही. सरकारला विचारच करावा लागेल. पैसे देऊन संप चालू राहणार तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट आहे. असा विचार सरकार करु शकतो. त्यामुळे आम्ही चार पावलं पुढे आलोय. दोन पावलं तुम्ही मागे व्हा, असे आवाहन अनिलल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
जी आश्वासनं मी देतोय, काही जाचक अटी असतील त्यावर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नसल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्या मदतीनं एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा जो त्यांच्या डोक्यात आहे. सातवा वेतन आयोग द्या आणि करार 10 वर्षाचा करा, अशीही मागणी आली. त्यावरही विचार केला जाऊ शकतो, असंही परब यांनी सांगितले.