सोलापूर : पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. यामध्ये ५ जण जागीच ठार झाले आहेत तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला. शनिवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. या अपघातात दोन लहान मुले, महिला जखमी झाले आहेत.
भीमा नदी पुलावर रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघातस्थळी नादुरूस्त रस्त्यामुळे हा अपघात झाला असून याप्रकरणी संबंधित दोन्ही रस्ता ठेकेदारांसह मृत वाहनचालकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. एकेरी वाहतूक सुरू असताना, रस्ता दुरूस्त करताना तेथे कोणत्याही प्रकारच्या सावधानतेचा किंवा दिशादर्शक फलक लावण्यात आला नाही. तसेच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असताना खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसाच्या माहितीनुसार मळीचा टँकर (एम. एच. १४ / सी.पी. ४०२०) हा इंदापूरहून सोलापूरकडे निघालेला होता. सोलापूर हद्दीतील माढा तालुक्यात भीमा नगर येथे एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर हा टँकर आला असता समोरुन येणारा तांदळाचा ट्रक (एम.एच.२५ / यू४०४५) रस्ता दुभाजकाला धकडून समोरून येणा-या या टँकरवर जोरदार आदळला. अपघातातील दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चेंदामेंदा झाला असून अपघात होताच ट्रक महामार्गावर आडवा झाला.
मालमोटारचालक शिवाजी नामदेव पवार व टँकरचालक संजय शंकर कवडे (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यासह मालमोटारीतून प्रवास करणाऱ्या व्यंकट दंडघुले (रा. सालेगाव, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) आणि अन्य दोघे अनोळखी प्रवासी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर दत्ता अशोक घंटे (वय २४, रा. सालेगाव, ता. लोहारा), व्यकूसिंह रतनसिंह राजपूत (वय ६६, रा. केसरजवळगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), गौरी दत्ता राजपूत (वय ३३, रा. पुणे), तिची मुले धीरज (वय १२) व मीनल (वय ४) आणि सुलोचना गोटूसिंह राजपूत (रा. पुणे) हे सहाजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इंदापूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भिमानगर परिसरातील एका धाब्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. सोलापूर- पुणे महामार्गावर असलेल्या भीमा नदीच्या पुलावर इंदापूरकडे जाणाऱ्या मार्गाचे काम चालू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. टँकर चालकाचा ताबा सुटून वाहन प्रथम दुभाजकावर आदळले व नंतर ट्रक आणि टॅंकरची धड झाली.
स्थानिकाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची अद्याप ओळख समोर आलेली नाही.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने रोडच्या दोन्ही बाजूने दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक खोळंबली होती. टेंभुर्णी, इंदापूर व महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी व पोलिसांना दिड तासाच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात यश आले.