सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीचेच नेते ज्ञानदेव रांजणे यांनी केला. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बंडखोर रांजणे यांची भेट घेऊन त्यांना कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड केले.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्रे भाजपकडे येत असतील तर लागेल ती मदत करू, असेही पाटील म्हणाले. “मी आज रांजणे यांची सदिच्छा भेट घेतली. मी विद्यार्थी चळवळीतून आलेला माणूस आहे. संघर्ष करत आलोय. त्यामुळं संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला अप्रूप असतं. मी तशा लोकांना भेटतो. मी त्यांना भेटल्यामुळं रांजणेंची निष्ठा बदलत नाही. कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाहीत याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आलो.”, असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्रे भाजपाकडे येत असतील तर लागेल ती मदत करू, असंही ते म्हणाले.
आज पहाटेच पोहोचून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. आज भल्या पहाटे भाजपा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
स्थानिक निवडणुकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य देणारी आपली पार्टी आहे. पक्षाच्या चौकटीतच सर्व काही करायला पाहिजे असे बंधन आमचे नसते. असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार आणि आमदार शिवेंद्रराजे यांचे निष्ठावंत समर्थक ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी भल्या पहाटे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अचानक दिलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर उपस्थित होते. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याशी काही गोष्टींबाबत चर्चा केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एकाच पॅनेलमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह शशिकांत शिंदे देखील होते. शशिकांत शिंदे यांच्या पराभवनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळीत येऊन ज्ञानदेव रांजणे यांचा जाहीर सत्कार केला होता. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्याने राज्यात चांगलीच चर्चा झाली होती. याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांनी देखील घेतली.