सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपलाच पक्ष संपवला हे अजून त्यांच्या लक्षात येईना, असं पाटील म्हणाले. तसेच राज्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे, असंही ते म्हणाले.
सांगलीच्या पेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवार आणि संचालकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इस्लामपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.
‘मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवला आहे. राज्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे. आता गावागावात भाजपची ताकद वाढली आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत’, असं म्हणत पाटील यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील. स्थानिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर त्या-त्या जिल्हाध्यक्षांनी भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याशी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. चर्चेशिवाय कोणताही निर्णय परस्पर घ्यायचा नाही’, असं आदेशही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले.
महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला असला तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावलाय.
राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांत भाजपने 21 जागा जिंकल्यात. त्यामुळे भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ 12 जागाच मिळाल्यात. मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने आपला पक्षच संपविला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाही. असो; हा त्यांचा प्रश्न असल्याचेही म्हटले.