सोलापूर : कोरोनाकाळात गैरव्यवहारांना मोकळीक देणाऱ्या सरकारने लोकांना दोन वर्षे लॉकडाऊन सहन करायला लावला. पण आता ओमिक्रॉनच्या नावाने लोकांना सरकारने घाबरवू नये. लोक लॉकडाऊनच्या मानसिकतेत नसल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापुरात म्हटले आहे.
दरेकर हे एका लग्ना समारंभासाठी आज (मंगळवारी) सोलापुरात आले होते. ते शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीसांवर असे शंभर खटले टाका, महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वर्ष निष्कलंक कारकीर्द कुठलाही मुख्यमंत्री आत्तापर्यंत करू शकला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत एक रुपयाचा डागही त्यांच्या चारित्र्यावर लागलेला नाही. या सर्वांचे उत्तर न्यायालय योग्यवेळी देईलच, त्यामुळे अशा खटल्यांना आम्ही भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.
मोफत वीज, सवलतीत वीज या घोषणा तर हवेतच पण महाविकास आघाडी सरकारने बीलासाठी वीज तोडल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून तातडीने वीज नाही जोडली तर उग्र आंदोलन करू आणि उद्रेकाला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.
सरकारने राज्यात एक इंचही विकास केला नाही. महाराष्ट्र २५ वर्षे मागे गेला आहे. उलट फडणवीस सरकारने सुरु केलेली विकास कामे रद्द करणे अथवा त्यांना निधी न देण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देणाऱ्या ठाकरे सरकारचे शेतकरी प्रेम हे पुतना मावशीचे असल्याचाही टोला दरेकर यांनी लगावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारमध्ये असणारा विसंवाद हा प्रशासनामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे राज्याचा विकास एक इंचही पुढे जात नाही, त्यामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. तीन पक्षांचे हे सरकार आपापल्यातील विसंवाद आणि आंतरिक विरोधातून शंभर टक्के कोसळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना युपीएत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘शिवसेना या अगोदरच काँग्रेसबरोबर गेली. आता ती युपीएत गेली तर काही मोठा फरक पडणार नाही. सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिली, असंही प्रवीण दरेकरांनी म्हटंल आहे.
* शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालतंय
दरेकर म्हणाले, कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होतं, मात्र आता शिवसेनेचा केंद्रबिंदू हे गांधी घराणं झालेला आहे, त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे.
शिवसेना या अगोदरच कॉंग्रेसबरोबर गेलीय, आता ती यूपीएत गेली तर काही मोठा फरक पडणार नाहीये. सत्तेसाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिलीय. महाविकास आघाडी सरकार हे दीर्घकाळ टिकू शकत नाही.
* संभाजी ब्रिगेडच्या कृतीचे समर्थन
अखिल भारतीय साहित्य संम्मेलनात ज्येष्ठ संपादक गिरीष कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या प्रकारावरही दरेकर यांनी मोजक्या शब्दात भाष्य केलं. विचारवंत, पत्रकार, लेखकांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते. त्यामुळे त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहिजे.
जर अशा लोकांनी बेमालुमपणे समाजाच्या भावना बिघडवल्या, श्रद्धास्थानांवर लिहिलंत तर ऍक्शनला रिऍक्शन मिळणारच. त्यामुळे गिरीश कुबेरांवरील शाई हल्ला ही ऍक्शनला रिऍक्शन होती, अशा स्वरूपात ती करायला नको होती, मात्र ती ऍक्शनला आलेली रिऍक्शन होती, असं म्हणतं प्रवीण दरेकरांनी संभाजी ब्रिगेडने केलेल्या कृतीचं समर्थन केलं आहे.