सोलापूर : सोलापूरच्या महिला संघासह पुरुष संघानीही ५७ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. सायंकाळच्या सत्रात सोलापूरच्या पुरुष संघानी नाशिक जिल्ह्यास १४-१३ असे ५.३० मिनिटे राखून नमविले. मध्यंतरापर्यंत नाशिकने कडवी लढत दिली. ९-८ अशी एका गुणाची निसटती आघाडी सोलापूरकडे होती. नंतर मात्र, सोलापूरने संरक्षण व आक्रमनाची प्रेक्षणीय खेळी करीत सामना एकतर्फी जिंकला.
रामजी कश्यप (२.००, २.३० मिनिटे व ४ गुण), राहुल सावंत (२.३०, १.०० मिनिटे नाबाद) व हबीब शेख (१.२० मिनिटे २ गुण) हे सोलापूरच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. नाशिकच्या चंदू चावरे (१.४०,१.१०मिनिटे व ३ गुण) दिलीप खांडवी (१.४० मिनिटे व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
वेळापूर येथील अर्धनारी नाटेश्वर क्रीडा मंडळाने ही स्पर्धा राज्य खो खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
यावेळी स्पर्धा अध्यक्ष उत्तमराव जानकर, अर्जुन पुरस्कार विजेते सुयश जाधव, खो खो संघटनेचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख,माजी सचिव जे. पी. शेळके, क्रीडा व युवक खात्याचे उपसंचालक अनिल चोरमोले, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, नारायण जाधव, जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
राहुल सावंत याने खेळाडूना शपथ दिली. स्पर्धा सचिव जावेद मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीस भारतीय खो खो महासंघाचे माजी सरचिटणीस मुकुंदराव अंबरडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे व ठाणे उपउपांत्य फेरीत
पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
सोलापूर : पुरुष व महिला गटाची ५७वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटात अहमदनगर, पुणे, सांगली, ठाणे व मुंबई उपनगर तर महिला गटात सोलापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, पुणे व ठाणे या जिल्ह्यांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.
वेळापूर (ता. माळशिरस) येथील पालखी मैदानावर शनिवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. सकाळच्या सत्रात पुरुष गटात अहमदनगरने सिंधुदुर्गवर १८-६ अशी एक डावाने मात केली. यात अकाश ढोले याने ४ गुण मिळवित ३.२० मिनिटे संरक्षण करीत अष्टपैलू खेळ केला. आवेज पठाणने २.५०मिनिटे मिनिटे पळती केली. दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरने बीडवर २३-१२ अशी एक डावाने नमविले. अक्षय भांगरे याने ५ गडी बाद करीत १.१० मिनिटे नाबाद खेळी केली. अनिकेत पोटे (२.५० व २.१० मिनिटे व २ गुण) याने अष्टपैलू खेळ केला. बीडकडून तुकाराम कराडे (३ गुण) याने एकाकी लढत दिली.
महिला गटात सोलापूरने धुळेवर २२-३ असा एक डावाने दणदणीत विजय मिळविला. शिवानी येंड्रावकरणे आपल्या धारधार आक्रमणात ८ गडी बाद करताना २.०० मिनिटे नाबाद खेळी करीत अष्टपैलू कामगिरी केली. प्रीती काळे हीने ४.५० व अर्चना व्हनमाने हीने ४.१० मिनिटे नाबाद संरक्षणाची बाजू सांभाळली. संध्या सुरवसे हीने ६ गडी टिपले. दुसऱ्या सामन्यात उस्मानाबादने पालघरवर १५-६असा डावाने शानदार विजय मिळविला. यात आश्र्वीनी शिंदे (३.५० मिनिटे व ४गुण), संपदा मोरे (३.०० मिनिटे व ५गुण), किरण शिंदे (२.३० मिनिटे नाबाद व २ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. पालघरकडून कृपेक्षा महेर (१.१० मिनिटे व १गुण) हीने एकाकी लढत दिली.
सकाळच्या सत्रातील अन्य निकाल : पुरुष : पुणे वि.वि.नंदुरबार १९-१० एक डावाने, सांगली वि.वि. जळगाव २७-९ एक डावाने, ठाणे वि.वि. रत्नागिरी २५-११ एक डावाने.
महिला : रत्नागिरी वि.वि. रायगड २९-८ एक डावाने, पुणे वि.वि. नाशिक १३-११ पाच मिनिटे राखून, ठाणे वि.वि. जालना २१-८ एक डावाने.