मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतानाच आता म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज (रविवार) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची परीक्षाप्रमाणेच ही परीक्षा रद्द केल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. आज परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो, असेही ते म्हणाले.
ज्या कंपनीला पेपरचं काम देण्यात आलं त्याच्या मालकाच्या लॅपटॉपमध्ये काही प्रश्नपत्रिका आढळल्या. पोलिसांनी कारवाई केली आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या म्हाडा घेईल. परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी म्हाडा परत करेल शिवाय पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी फी घेणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. काल शनिवारी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यात त्यांनी सांगितलं की म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आज ही परीक्षा होणार नाही. काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा थेट जानेवारी 2022 मध्ये घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी विद्यार्थ्यांची माफीही मागितली आहे. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जावू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासासाठी माफी मागत विद्यार्थ्यांनी सकाळी केंद्रावर जाण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नये, यासाठी आपण एवढ्या रात्री हा व्हिडिओ शेअर करत असल्याचंही आव्हाडांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. दरम्यान म्हाडाची परीक्षा आता जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे.