मुंबई : म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी आज परीक्षा नियोजित होती. मात्र ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच आता म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. अंकुश हरकळ, संतोष हरकळ आणि डॉ. प्रीतिश देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 18 डिसेंबर पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी आज (12 डिसेंबर) परीक्षा नियोजित होती. मात्र, ‘अपरिहार्य कारणामुळे’ ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षार्थींनी मात्र परीक्षेचा पेपर फुटल्याची शक्यताही बोलून दाखवली. या कारवाईमुळे बोलण्याला पुष्टीच मिळाली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी आज (रविवारी) परीक्षा नियोजित होती. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर-फेसबुकवर काल मध्यरात्री व्हीडिओ शेअर करत सांगितलं की, “सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून, काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे उद्याची (रविवार) होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा या जानेवारीत घेतल्या जातील. त्या पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले होते.
ज्या कंपनीला पेपरचं काम देण्यात आलं त्याच्या मालकाच्या लॅपटॉपमध्ये काही प्रश्नपत्रिका आढळल्या. पोलिसांनी कारवाई केली आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या म्हाडा घेईल. परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी म्हाडा परत करेल शिवाय पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी फी घेणार नाही, असंही दुपारी त्यांनी सांगितलं.
म्हाडाच्या परीक्षेविषयी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या सगळ्या प्रकाराविषयी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, “म्हाडाच्या परीक्षाप्रकरणी गोपनीयतेचा भंग झाला, अशी पोलिसांनी तक्रार घेतली आहे. पेपर फुटला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही,अशी शंका आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे पेपर फक्त एकाच व्यक्तीला माहिती होते आणि तीच व्यक्ती असं करत असेल, तर विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सगळ्या परीक्षांचे दलाल हे साधारण एकाच टोळीतले आहेत.
अमिताभ गुप्ता म्हणाले, “म्हाडाचा पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना क्राइम ब्रांचची पथके तयार करून संशयितांना औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे, पुणे परिसरातून ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केलीय.
“टार्गेट करियर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव यांच्याकडे म्हाडाच्या परीक्षेला बसलेल्या 3 विद्यार्थ्यांचे ओळख पत्र मिळाले होते. त्याचबरोबर पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थींना पेपर देण्याचे ठरवले होते.”
ते पुढे म्हणाले, “पोलिसांनी अजय चव्हाण, कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे 3 विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र, कोरे चेक, आणि आरोग्य विभागाच्या क आणि ड परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या मिळल्या.
“संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांचा मागोवा घेतला असता पोलिसांना त्यांच्या कारमध्ये म्हाडाची परीक्षा ज्या संस्थेच्या मार्फत घेण्यात येणार होती.
त्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख दिसून आले. देशमुख यांच्या झडतीमध्ये त्यांच्या लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या परीक्षेचे पेपर मिळून आले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह मिळून आले. त्यामध्ये म्हाडा परीक्षेचे पेपर सेट असल्याचं आढळलं आहे. या प्रकरणी अंकुश हरकळ ( रा. बुलढाणा ), संतोष हरकळ ( सध्या रा. औरंगाबाद ) आणि डॉ. प्रीतीश देशमुख (रा. पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 18 डिसेंबर पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.