सोलापूर – सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या चोरी घरफोडीचे ५ गुन्हे उघडकीस आणून २ लाख १० हजाराचा मुद्देमाल परत मिळविला आहे.
मार्डी येथे राहणाऱ्या शंकर अप्पा पवार यास संशयावरुन पोलीसांनी ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३६ ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्यानं सोलापूर शहरात जोडभावी हद्दीत ३, फौजदार चावडी हद्दीत १ अशा चार ठिकाणी गेल्या काही दिवसात बंद घरं फोडून चोरी केल्याचं कबुल केलं. त्याच्याकडून १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलायं. तर अन्य एका घटनेत एका अल्पवयीन मुलीस ताब्यात घेवून तिच्याकडून किडवाई चौकातील तौहीद ज्वेलर्समध्ये महिलेच्या पर्समधून चोरण्यात आलेल्या १ लाख २० हजारापैकी ९६ हजार रुपये परत मिळविले आहेत.
एकूण ५ गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलीस आयुक्त हरिश बैजल, उपायुक्त बापू बांगर यांनी गुन्हे शाखेचे पो.नि. संजय साळुंखे, श्रीनाथ म्हाडीक तसेच अंमलदार अंकुश भोसले, अजय अडगळे, शंकर मुळे, संदीप जावळे, विद्यासागर मोहिते, सुहास अर्जुन, वशिम शेख, आरती यादव, रत्ना सोनवणे, निलोफर तांबोळी याचबरोबर अलझेंडे आणि ढाकणे यांच अभिनंदन केलं आहे.
* जुगार अड्ड्यावर छापा
सोलापूर : जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन ठिकाणी कारवाई केली आहे. याप्रकरणी बाबुराव जयवंत क्षिरसागर यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून राजकुमार गुराप्पा गायकवाड (वय ४८, रा. लिमयेवाडी, सोलापूर) व राहुल गायकवाड (रा. रामवाडी सोलापूर) यांच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संशयित आरोपी हे दहा टक्के कमिशनवर रस्त्याच्या वर येणारे-जाणारे लोकांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आकड्यांवर पैज लावून कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना मिळून येऊन जुगाराचे साहित्य असा एकूण ९ हजार ५९५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून या घटनेचा पुढील तपास पोह. पवार हे करीत आहेत.
तशीच दुसरी घटना हि दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ येथील जय मल्हार चौक येथे घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य राजेंद्र माने यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मारुती
विष्णू गवळी (रा. साठे चाळ , बुधवार पेठ सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संशयित आरोपी हे कल्याण जुगार मटका घेऊन रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या – लोकांना उपद्रव करताना मिळून आल्याने त्यांच्याकडील घरचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोह. जाधव हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अक्कलकोटमध्ये दानपेटी पळवली
सोलापूर – अक्कलकोट मधील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या आवारातील एक दानपेटी चोरट्यांनी त्यातील पैशासह चोरुन नेली आहे. चोरीला गेलेल्या दानपेटी जवळपास तीन हजाराची चिल्लर असावी असं पोलीसामध्ये देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हंटलयं.
* गर्दी जमावणाऱ्यासह ३८ जणांवर गुन्हे दाखल
सोलापूर : सोलापूर शहरात मिरवणुका, आंदोलन, संप, निदर्शने सभा घेण्यासाठी पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यासाठी मनाई आहे. पण तरीही या या नियमांचा भंग केल्याप्रकरणी जवळपास ३८ जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यात “दिव्य काशी भव्य काशी” या कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीनवर दाखवून गर्दी जमवून नागरिकांच्या जीवितास धोका केल्याप्रकरणी गणेश राजकुमार साखरे, सचिन अशोक कुलकर्णी यांच्यावर जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या कोरोनामुळे सर्व सभागृहात पन्नास टक्के पेक्षा अधिक लोकांना येण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहे.
पण तरीही हुतात्मा स्मृती मंदिर येथे साडेपाचशे लोकांना प्रवेश दिल्याप्रकरणी रवी सिद्राम गोणे, संतोष वेदपाठक (दोघे रा. जुळे सोलापूर) यांच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशाच प्रकारे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र आणत संगमेश्वर नगर माऊली मंदिर जवळील सार्वजनिक रोडवर वाहन चालकांना त्रास होईल अशा पद्धतीने जमाव जमवून रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच निलम नगर येथील मराठी शाळेच्या शेजारी रस्त्यावर स्टेज मारल्याप्रकरणी आनंद मुसळे, विनायक नामाजी, सुनील चंद्रकांत जाधव, सिद्धाराम नागठाणे यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दिव्य काशी व भव्य काशी या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपणकरून लोकांची गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अशाच प्रकारे घोंगडे वस्ती येथील नीलकंठेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये ही लाईव्ह टेलिकास्ट केल्याप्रकरणी जगदीश व्हड्राव, नागेश दुर्गम, सुधाकर नराल यांच्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.