पुणे : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठं विधान केले आहे. ते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल कोरोना काळातही सुरूच असून, पुढील वर्षी ती जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था बनेल. तसेच आगामी काळात आपला देश औद्योगिक उत्पादनाचे जगभरातील सर्वांत मोठे केंद्र असेल, असं विधान केले आहे.
भारताचे गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि इमारतीसमोरील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याचे भूमिपूजन गृहमंत्री शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी पुणे महापालिकेत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नसल्याची टीका अमित शाह यांनी काँग्रेसवर केली आहे.
शाह म्हणाले, भारतरत्न पुरस्कार त्यांना कॉंग्रेस सरकार नसताना आणि भाजपच्या काळात मिळाला. संविधान दिवस जेव्हा केला त्यावेळीही काँग्रेसने विरोध केला आहे. पण मोदी संविधानाला ग्रंथ मानून सरकार चालवत आहेत. पुण्याच्या विकासाची अनेक कामे मोदी सरकारने केली. विमानतळ वाढवणे, मेट्रो ज्याचे तीन मार्ग केले, लवकरचं पुण्याला मेट्रो प्रवास सुरू होईल, बस दिल्या, मुळा मुठा नदी सर्वधन साठी निधी दिला, स्टार्टअपला प्रोत्साहन दिलं, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे आम्ही कुठही कमी पडणार नाही असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच देश आत्मनिर्भर होणार असून, प्रत्येक व्यक्तीचा सर्वसमावेशक विकास होण्यासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या (व्हॅमनिकॉम) काल रविवारी आयोजित वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्रीय सहकारमंत्री शहा बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव देवेंद्र कुमार सिंह उपस्थित होते. दीक्षांत समारंभात व्हॅमनिकॉम’च्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदविकाधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* येत्या काही दिवसांत देशात नवीन सहकार धोरण येणार
अमित शहा म्हणाले, देशातील १३० कोटी नागरिक आत्मनिर्भर होण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत देशाचे नवीन सहकार धोरण तयार करण्यात येणार आहे. देशातील मल्टीस्टेट सहकारी संस्थांमधील त्रुटी दूर करण्यात येतील. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण करून त्या जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक आणि नाबार्डशी जोडून त्यांच्या माध्यमातून कृषी वित्त पुरवठा सक्षम करण्यात येईल.
त्याचा देशातील गरीब आणि लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत विविध २३ विभागाच्या योजना सक्षम करण्यात येणार आहेत. आगामी काळात सहकार क्षेत्राचे भवितव्य उज्वल राहणार असून, विद्यार्थ्यांनी सहकार क्षेत्रात पुढे येऊन सहकार चळवळ मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार असून, कृषी उत्पादनास योग्य भाव मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आगामी काळात सहकार क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन सहकार धोरणामध्ये सहकार क्षेत्र अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले.
* सकाळीच घेतले दगडुशेठचे दर्शन अन् घातला अभिषेक
अमित शहा यांनी पुण्यातील प्रसिद्ध गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले आहे. शहा यांनी आज पुणे येथे आज श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली.
”महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो… असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.”