सोलापूर : आज सोलापुरात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे येथे आणि सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी अशा अपघाताच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या यात चारजण ठार तर दोनजण जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात पहाटे झाले आहेत. ही पहाट त्यांच्यासाठी काळरात्रच ठरली.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार तर चारजण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ आज रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.
दुसऱ्या अपघातात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला भरधाव जाणाऱ्या कारने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी शिवारातील एका हॉटेल समोर आज पहाटे साडेसहा वाजता झाला.
गुरसाळेजवळील अपघातातील मयत आणि जखमी हे नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि सिन्नर येथील आहेत.
या अघातातील फिर्यादी किशोर संपत लोखंडे (वय २७, रा. चादोरी, ता. निफाड, जि. नाशिक) हे त्यांची पत्नी रेश्मा लोखंडे, मामा त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड, सुरज भीमराव ठोंबरे (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यांच्यासह एमएच ४६/डब्ल्यू ८९०३ या क्रमांकाच्या ओमनी गाडीतून देवदर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते. पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे गावाच्या हद्दीत त्यांची गाडी आली असताना पुढे रिफ्लेक्टर नसलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह ऊस घेऊन निघाला होता.
ओमनीचा चालक सौरभ प्रभाकर घोडके (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यास रिफ्लेक्टर नसलेली ट्रॉली न दिसल्याने भरधाव वेगात ओमनी गाडी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून धडकून अपघात झाला. अपघातात ओमनी कारमधील संजीवनी मारुती आव्हाड (वय ३५, रा. निफाड), सूरज भीमराव ठोंबरे (वय २१) या दोघांचा मृत्यू झाला. गाडीतील किशोर संपत लोखंडे, रेश्मा लोखंडे, त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातप्रकरणी किशोर लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओमनीचा चालक सौरभ घोडके याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाचीवाडी अपघाताबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इको कार (क्र. एमएच ०४ डीके १११३) मधून देवदर्शनासाठी मुंबई येथून तुळजापूरकडे दिपक दगडू उबाळे, यासह यांचा मुलगा राहुल दिपक उबाळे (दोघेही रा. चेंबूर, मुंबई), अमोल दिपक पवार (रा. मरळ, मुंबई) व सुखदेव गजानन शिंदे (रा. आंबेवाडी ठाणे) असे चार जण निघाले होते.
दरम्यान, त्यांची इको कार मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीत आली असता निलकमल हॉटेल समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रक (एमएच ११ एएल ७१४९) ला पाठीमागून जाऊन जोरात धडकली. यामध्ये दीपक दगडू उबाळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा राहुल दीपक उबाळे (वय २६) यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या अमोल दिपक पवार (वय २६) यांची प्रकृती चिंताजनक असून, चालक शिंदे हेही जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग पथकाने जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सोलापूर येथे पाठवले. देवदर्शनासाठी निघालेल्या उबाळे पिता-पुत्रांच्या या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या या अपघाताची खबर सावळेश्वर टोल नाक्याच्या पथकाचे अमर डोंबे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.