मोहोळ : रस्ते कामात ठेकेदारांना टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कठोर पावले उचलून २२ लोकप्रतिनिधींची यादी चौकशीसाठी सीबीआयकडे सुपूर्द केली आहे. या बावीस जणांच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीचा समावेश असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला.
या आरोपामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून टक्केवारीची अपेक्षा करणाऱ्या तसेच त्यासाठी ठेकेदारांना त्रास देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज आहेत.
महाराष्ट्रातील अशा २२ लोकप्रतिनिधींची यादी त्यांनी चौकशीसाठी सीबीआयकडे सुपूर्द केली असून सखोल चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींमध्ये घबराटीचे वातावरण असताना मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खळबळजनक दावा केला आहे.
यावेळी बोलताना संजय क्षीरसागर म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ठेकेदारांना त्रास देतात म्हणून ना. गडकरींनी ज्या-त्या पक्ष प्रमुखांकडे तक्रार केली होती. त्यांनी दखल न घेतल्यामुळे मंत्री गडकरींनी २२ जणांची यादी करून ती यादी सीबीआयकडे चौकशीसाठी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्या बावीस जणांच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीचे नाव आहे. याची खात्रीशीर माहिती माझ्याकडे आहे. पण पुरावा नसल्यामुळे मी त्या लोकप्रतिनिधीचे नाव घेऊ शकत नाही.
मात्र गेल्या पाच वर्षात मोहोळ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे जे आमदार निवडून आले, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे तालुका कुविख्यात झाला. त्यामुळे चालू टर्ममध्ये मोहोळ विधानसभा मतदार संघाचे नाव खराब होऊ नये, अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो. ते नाव मला माहित आहे पण माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे ते नाव मी आता घेऊ शकत नाही, असे म्हटले.
पुढे बोलताना क्षिरसागर म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सुरू असलेला ‘जनता दरबार’ हा राष्टवादीची अंर्तगत लुटूपुटूची लढाई असून एखाद्या पक्षांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये उघड होणारी गटबाजी पाहता भविष्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा फुटीच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले असून याचा भाजप अथवा शिवसेनेला कोणताही तोटा नाही, उलट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे म्हटले.
पक्षांतर्गत गटबाजीमध्ये पक्षश्रेष्ठी लक्ष घालत नसल्याचे त्यांनाही स्थानिक नेतृत्वावर होणारे आरोप मान्य असल्याचे चित्र असल्याचा आरोप भाजपाचे नेते संजय क्षीरसागर यांनी केला.